Press "Enter" to skip to content

७६ वा हैद्राबाद (मराठवाडा ) मुक्ती दिन नवी मुंबईत साजरा !

७६ वा हैद्राबाद (मराठवाडा ) मुक्ती दिन नवी मुंबईत साजरा !

नवी मुंबई, प्रतिनिधी : राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ७६ वा हैद्राबाद (मराठवाडा ) मुक्ती दिन खारघर, नवी मुंबई येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहात डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात अनागरिक धम्मपाल , पेरियार स्वामी नायकर , प्रबोधनकार नारायण ठाकरे , सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि हैदाबाद मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
माजी जिल्हा न्यायधीश डॉ. यशवंत चावरे , प्राचार्य वि, ना . गायकवाड, प्राचार्य एम व्ही तिगोटे, प्रा. पत्रकार संजय महाडिक , बुद्धभूषण गोटे , रत्नमाला डोंगरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर भरगच्च कार्यक्रम झाला.
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान कार्यक्रमात झाला. गायक विनोद विद्यागार, मंगल माने, सिद्धी महाडिक , संगीता वाघमारे, मुक्ता शाक्य यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या ज्याजवल्य इतिहास गीतातून मांडला. प्राचार्य वि, ना गायकवाड यांनी १९७२ च्या दुष्काळानंतर आणि नामांतराच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात मुंबई प्रदेशात स्थलांतर झाले त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. निजामाच्या विरोधात आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभा करण्याचा संदेश दिला, मात्र स्वातंत्र्यानंतर मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्रात आणि पर्यायाने मुंबई प्रदेशात स्थलांतरित झालेली मराठवाड्यातील जनता आजही उपक्षीतच असल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

प्रमुख व्याख्याते डॉ. विजय मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा व वल्लभभाई पटेल यांच्या हैदाबाद मुक्ती संग्रामातील विश्लेषण केले, हैद्राबाद मुक्ती संग्राम हा मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नसून तो स्वातंत्र्याची आणि भारतात विलीन होण्याची प्रक्रिया होती, असे मत मांडले. एम व्ही तिगोटे यांनी ३० लाख स्थलांतरित आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील नागरी समस्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे व राजकीय पक्षाची व मराठवाड्यातील नागरिकांची समस्या सोडविण्यात उदासीनता असल्याचे नमूद केले. १९९५ पासून मुंबई महानगर प्रदेशातील मराठ्वाडाकर मंडळींनी हिंदुत्ववादी राजकारण्यांना भरघोस निवडून दिले. त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने घेतले नाही. झोपडीधारकांच्या मालकी हक्कांचा प्रश्न सर्वांना घरे या अभियानातून सुद्धा सुटला नाही, अशी खंत व्यक्त केली.

डॉ. यशवंत चावरे यांच्या अध्यक्षेखाली नेमलेल्या समितीने गेल्या ७५ वर्षात मराठवाडा आणि मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संविधानिक, मानवी हक्क, शिक्षण ,आरोग्य, सामाजिक सबलीकरण व न्यायासाठी ज्या संस्थांनी आणि व्यक्तींनी विशेष योगदान दिले त्यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. राहुल शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई महानगर प्रदेश मराठवाडा हितकारिणी संघ, आदर्श सामाजिक संस्था , अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठान , आणि प्रजा सबलीकरण महासभा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानित व्यक्ती आणि संस्थांचा गौरव २६ नोव्हेंबर २०२३ रोजी व्यक्तींना २५ हजार आणि संस्थांना ५० हजार रोख रक्कम व सन्मान चिह्ने , भारताचे संविधान देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे न्या.चावरे यांनी जाहीर केले. त्या व्यक्ती आणि संस्था व त्यांचे कार्य पुढे दिल्या प्रमाणे आहे.
गायरान हक्क चळवळीचे प्रणेते दादासाहेब गायकवाड, दुष्काळी मराठवाड्यात लोक सहभागातून पाणी चळवळ उभे करणारी पाणी फाउंडेशन , वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण आणि आरोग्य सेवा यासाठी एम जी एम चे संस्थापक कमलकिशोर कदम , बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ भीमराव यशवंत आंबेडकर, राहुल शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण अनुसुचित जाती जमाती कायदा सल्ला आणि साहित्य प्रकाशनासाठी डॉ बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रकाशन संस्था, एक गाव एक पाणवठा चळवळीचे प्रणेते डॉ बाबा आढाव, वंचितांच्या शिक्षणाच्या जागृतीसाठी डॉ ना. य डोळे, संशोधक मार्गदर्शक आर के क्षीरसागर , धम्म चळवळीसाठी डॉ उपगुप्त महाथेरो, डॉ एस पी गायकवाड, मुंबई महानगर प्रदेशात मराठवाड्यातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना झोपडी उभे करण्यात योगदान दिलेल्या दलित नेता नामदेव ढसाळ यांच्या पश्र्च्यात त्यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख, पत्रकारितासाठी विवेक गिरधारी आणि श्रीमती राही भिडे यांची नावे जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. डोंगरगावकर यांनी मुंबई महानगर प्रदेशातील ३० लाख मराठवाड्यातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत हक्क आणि त्यासाठी गेल्या ६० वर्षातील सत्ताधाऱ्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला. समता , स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय मिळावा म्हणूनच मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात आणि त्यासाठी मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री मताच्या पेटीवर लक्ष ठेवून अन्य प्रदेशातील नागरिकांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यात धन्यता मानतात , मात्र मराठवाडा आणि मराठवाड्यातून मुंबई महानगर प्रदेशात स्थलांतरित झालेले नागरिकांची आजही उपेक्षा होत असल्याची खंत डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केली,
पुढच्या काळात गैरराजकीय संघटन मराठवाड्यातील नागरिकांच्या विधायक समस्या सोडविण्यासाठी उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला. उद्योग क्षेत्राकडे य प्रदेशातील लोकांनी मार्गक्रमण करण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले. आधुनिक शिक्षण हीच पुढील काळातील मोठी शक्ती तथा ऊर्जा असल्याचे डॉ डोंगरगावकर यांनी नमूद केले. तसेच मुंबई महानगर प्रदेशात डॉ बाबासाहेब आंबेकर हैद्राबाद मुक्ती संग्राम भवन उभारणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी सिडकोने जागा व निधी द्यावा, अशी मागणी यावेळी केली. कार्यक्रमाला मुंबई महानगर प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततापूर्ण , शिस्तबद्धपणे पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा, संगीता जोगदंड , संचालन प्राचार्या वनिता सूर्यवंशी, व आभार सुजाता भोसले यांनी मानले. तर पाहुण्यांचे स्वागत अक्षय कांबळे, ऍड हर्षल शाक्य , प्रा. अनिल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.