पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांना डीजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या कोविड योध्दा पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजा माने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त गणेश देशमुख यांनी कोविडच्या पहिल्या लाटेत पनवेल महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका तसेच दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिका याठिकाणी मोलाची कामगिरी बजावली. कोविड रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यापर्यंत त्यांनी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोविड काळात दिवसरात्र एक करून रूग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चाचण्यांचे प्रमाण वाढवून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.तसेच कोविड लसीकरणावर लक्ष केंद्रित करून पालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
कोविड काळात बजावलेल्या या कामगिरी बद्दल आयुक्त देशमुख यांना डीजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.