नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व दालने ही अत्यंत उत्कृष्ट असून त्यामधून बाबासाहेबांच्या महनीय व्यक्तित्वाची अनुभूती स्मारकाला भेट देणा-या प्रत्येकाला लाभेल असे सांगत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय स्तराच्या सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या या प्रेरणादायी स्मारकातून प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारांची ऊर्जा लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भव्यतम स्मारकातील वातानुकूलीत अद्ययावत सभागृह, ध्यान केंद्र ( Meditation Center ), 'ई लायब्ररी' सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष (Holographic Presentation) अशा विविध सुविधांच्या लोकार्पण समारंभप्रसंगी पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर ठाणे लोकसभा सदस्य खा.श्री.राजन विचारे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय नाहटा, शासनाच्या वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. विजय चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेबांच्या अगाध ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य करीत समर्थ राज्यघटनेच्या माध्यमातून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही व सामाजिक न्याय प्रस्थापित होईल अशाप्रकारे समाजावर केलेल्या बाबासाहेबांच्या आभाळाएवढ्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही असे सांगत पालकमंत्री महोदयांनी हे स्मारक त्यादृष्टीने एक प्रयत्न आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी या स्मारकातील पूर्ण झालेल्या सुविधा नागरिकांकरिता खुल्या व्हाव्यात ही अनेकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती, त्यास अनुसरून महापरिनिर्वाण दिनाच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला या सुविधांचे लोकार्पण करता आले याबद्दल समाधान व्यक्त करताना पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी स्मारकातील सुविधा महापरिनिर्वाण दिनापूर्वी गुणात्मक दर्जा राखून पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि अभियंत्यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यासह शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाढे आणि सहकारी अभियंते, वास्तुविशारद, बांधकाम कंत्राटदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे यांनी स्मारकातील अद्ययावत स्वरुपाचे ग्रंथालय व त्यामधील अत्याधुनिक ई लायब्ररी सुविधा तसेच चरित्रात्मक छायाचित्र दालन, आंतरराष्ट्रीय होलोग्राफिक प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे भाषण प्रत्यक्ष बघण्याची सुवर्णसंधी, प्रशस्त ध्यानकेंद्र व सभागृह अशा प्रकारच्या सुविधा असणारे हे देशातील सर्वोत्तम स्मारक आहे असे मत व्यक्त केले. यापुढील काळात नवी मुंबईत नवनवे लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकपर मनोगतात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी स्मारकातील विविध सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या ही ख-या अर्थाने बाबासाहेबांप्रती व्यक्त केलेली आदरांजली आहे व आजचा दिवस भाग्याचा आणि अभिमानाचा आहे असे सांगत येथील इ-लायब्ररीसह अत्याधुनिक ग्रंथालय, जीवन प्रवास दर्शविणारे छायाचित्र दालन, बाबासाहेब प्रत्यक्ष संवाद साधत आहेत असे होलोग्राफीक प्रेझेन्टेशन, मन:शांती देणारे ध्यानकेंद्र, वैचारिक सामाजिक कार्यक्रमांसाठी अद्ययावत सभागृह अशा विविध सुविधा पुरविताना त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होतील याकडे कटाक्षाने लक्ष पुरविण्यात आले असल्याचे सांगितले.
या स्मारकातील प्रत्येक सुविधा बाबासाहेबांच्या महनीय व्यक्तीमत्वाला साजेशी होईल असा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये विशेषत्वाने छायाचित्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवन प्रवास साकारताना प्रत्येक पॅनलची उंची सर्वसामान्य माणसाच्या दुप्पट ठेवलेली आहे. ज्यामधून आपल्याला बाबासाहेबांसारख्या महनीय व्यक्तिमत्वाची महानता लक्षात येते विशेष विश्लेषण आयुक्तांनी केले. याप्रसंगी छायाचित्र दालन ऐतिहासिक माहितीदृष्ट्या परिपूर्ण होण्यात महत्वपूर्ण योगदान देणा-या अंतर्गत सुविधा समितीचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये समितीचे कार्याध्यक्ष श्री. विजय सुरवाडे, श्री. योगीराज बागुल, श्री. रमेश शिंदे, श्री. अनिल सवादकर, श्री. दादाभाऊ अभंग या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र अभ्यासक सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे या समितीचे उपाध्यक्ष श्री. संजु वाडे, सदस्य श्रीम. हेमांगी सोनावणे, श्री. जी.एस.पाटील, श्री. सिद्राम ओहाळ यांनाही सन्मानित करण्यात आले. हे छायाचित्र दालन साकारणारे सजावटकार श्री. समीर माळवदे व श्री. सचिन अडसूळ यांचाही सन्मान करण्यात आला. अशाच प्रकारे स्मारकातील ग्रंथालय परिपूर्ण होण्यासाठी विशेष योगदान देणारे लेट्स रीड फाऊंडेशनने ग्रंथालय संगणकीयदृष्ट्या अद्ययावत होण्यासाठी तसेच इ-लायब्ररीमधील इ-बुक, ऑडिओ बुक, व्हिडिओज् अशा सुविधा परिपूर्ण होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस विनामूल्य केलेल्या सहकार्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
या स्मारकामध्ये असलेला आभासी चलचित्र विशेष कक्ष एक अत्यंत महत्वाचे आकर्षण असून यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेबांचे भाषण होलोग्राफीक प्रेझेन्टेशनव्दारे बघण्याचा रोमांचकारी अनुभव घेता येणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी चितारलेल्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
नवी मुंबई शहरातीलच नव्हे देशातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून नावाजले जाईल अशा प्रकारे स्मारकातील सुविधा असल्याचे मत पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मान्यवर आणि नागरिकांनी व्यक्त केलेले असून यामुळे नवी मुंबईच्या नावलौकीकात लक्षणीय भर पडलेली आहे.