नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनचा मोठा आर्थिक फटका जिम व्यवसायाला बसला आहे. मागील सात महिन्यांपासून जिम बंद असल्याने जिम चालक व मालकांसह शेकडो जिम कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. सदर परिस्थिती दिवसागणिक अत्यंत गंभीर बनत चालली असून राज्यातील जिम सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशनने केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
दरम्यान, पर्सनल ट्रेनिंग व काऊन्सलिंगला परवानगी द्यावी, लॉक डाऊन काळात मृत्यू पावलेल्या जिम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, जिम व्यवसायातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सबसीडी लोन द्यावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश जिम असोसिएशनने मुख्यमंत्रांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून लॉक डाऊन सुरु झाला आणि एकूणच व्यवसाय लॉक झाले. जिम व्यवसाय बंद पडल्याने जिम मालक व चालकांसह जिम कर्मचारी आर्थिक संकटात आले. ट्रेनर, हेल्पर , स्वीपर असे शेकडो कर्मचाऱ्यांचे रोजगार थांबले. भाडे तत्वावर जिम चालविणाऱ्या जिम चालक व मालकांची तर मोठी आर्थिक कोंडी झाली. जिम व्यवसायावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबे सद्यस्थितीत रस्त्यावर आहेत. अनेक जिम कर्मचाऱ्यांचे जीव गेले. आता जगावे कसे, असा प्रश्न जिम चालक , मालक व जिम कर्मचाऱ्यांना पडला आहे.
राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने अनलॉकची सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापि जिम व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करून जिम व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिम असोसिएशनने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिम व्यवसाय पूर्णपणे सुरु करण्याची परवानगी देणे तूर्त शक्य नसेल तर किमान पर्सनल ट्रेनिंग व काऊन्सलिंगला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिम व्यवसाय ठप्प झाल्याने जिम मालक, चालक आणि कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. ज्या जिम व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून जिम सुरु केल्या, लॉक डाऊनमध्ये त्यांच्या लोनचे हप्ते थकले आहेत. आता बँकांनी लोन वसुलीसाठी तगादा लावल्याने जिम व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. याबाबत शासनाने तत्काळ तोडगा काढला नाहीतर, भयानक परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशचे महासचिव सुभाष विरोचन यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना जिम सुरु करण्याबाबत निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष विकास गायकवाड, महासचिव सुभाष विरोचन , खजिनदार संजीव मेनन, नवी मुंबई कमिटीचे अध्यक्ष विश्वास शिंदे यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, लॉक डाऊनचा आर्थिक फटका सर्वच स्थराला बसला आहे. त्यातून सावरणे गरजेचे आहे.जिम बंद असल्याने नक्कीच मोठे नुकसान झाले, अनेक कुटुंब अडचणीत आली. मात्र, जिम सुरु कारण्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यशासन घेणार आहे. त्यामुळे जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशनने दिलेले निवेदन आम्ही मुख्यमंत्रांकडे पाठवले असल्याची प्रतिक्रिया, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
कोकण दर्पण.