नवी मुंबई : महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी विश्वासार्ह वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. व्यापक प्रमाणावरील साधनसुविधांचा विकास होत असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. उदाहरणार्थ, नवी मुंबई सध्या डेटा सेंटर्ससाठी आवडीचे ठिकाण पुढे येऊ लागले आहे. ~३३० मेगावॅटच्या भाराच्या गरजेसह डेटा सेंटर्स आता जास्तीत-जास्त विजेचा वापर करू लागली आहेत. या डेटा सेंटर्सची एक प्रमुख गरज म्हणजे सातत्यपूर्ण, विश्वासार्ह आणि दर्जेदार विजेची उपलब्धता ही आहे. त्याचवेळी खारघर आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्राचे वैद्यकीय केंद्र म्हणून उदयास येऊ लागले आहे. आरोग्यसेवा संस्थांच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी अखंड वीजपुरवठा पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे या प्रदेशात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उभ्या राहू शकतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये संशोधन आणि विकासालाही प्रोत्साहन मिळू शकेल.
तसेच मेट्रो रेल्वे, द्रुतगती महामार्ग, हाय स्पीड रेल आणि जलमार्गांसोबत वेगवान शहरीकरणामुळे नवी मुंबई प्रदेशाचे रूपांतर लॉजिस्टिक्स हबमध्ये होईल. जेएनपीटी पोर्ट आणि आगामी नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात असल्यामुळे नागरिकांमध्ये भरभराट तर होईलच पण हा बदल घडून येण्यासाठी उद्योग आणि गृहनिर्माण सोसायट्यांना अखंड आणि विश्वासू वीजपुरवठा होणे अत्यावश्यक असेल.
सध्या एमएमआर प्रदेशातील सर्वोच्च विजेची मागणी सुमारे ४५०० मेगावॅट आहे आणि ती मुंबईत निर्माण केलेल्या विजेद्वारे – १८७७ मेगावॅट पूर्ण केली जाते आणि उर्वरित वीज मुंबईबाहेरून विद्यमान पारेषण नेटवर्कद्वारे येते. एमएमआरला वीज आयात करणे शक्य होते. परंतु वापराच्या बाबतीत तिची संपूर्ण क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही पारेषण वाहिनी बंद पडल्यास (दोष किंवा देखभालीमुळे) यंत्रणा गंभीर स्थितीत काम करते. त्यामुळे ट्रिपिंग होऊन (मुंबईतील वाहिन्या किंवा अंतर्गत निर्मिती) लोडशेडिंग होऊ शकते आणि आणखी ट्रिपिंग किंवा ओव्हरलोड झाल्यास ब्लॅकआऊटची शक्यता निर्माण होऊ सकते. ऑक्टोबर २०२० ची घटना एक प्रातिनिधिक म्हणून पाहता येईल. या परिस्थितीच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त आयएसटीएस फीडद्वारे विद्यमान पारेषण नेटवर्क मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
मुंबई ऊर्जा मार्ग, हा ऊर्जा मंत्रालयाने आखलेला आंतर राज्य पारेषण यंत्रणा प्रकल्प आहे. त्याची रचना मुंबई महानगर प्रदेशासासाठी विश्वासार्ह, परवडणाऱ्या दरातील आणि हरित ऊर्जेच्या निर्मितीच्या उद्दिष्टाने केली गेली आहे. कार्यान्वित झाल्यानंतर पारेषण प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वाची ऊर्जा जीवनरेखा स्थापित करण्यात मदत करेल, ज्याची क्षमता २००० मेगावॅटपेक्षा जास्त अतिरिक्त आयएसटीएस फीड वाहून नेण्याची असेल. हा प्रकल्प विद्यमान पारेषण नेटवर्कची गर्दी कमी करेल आणि त्यामुळे प्रदेशात वीज प्रवाह वाढवेल. तसेच ऊर्जा आवश्यकतेच्या संदर्भात भविष्यासाठी सुसज्जताही ठेवेल. तो तीन घटकांनी तयार झालेला आहे: ४०० केव्ही पडघा ते खारघर पारेषण वाहिनी, ४०० केव्ही पडघा ते नवी मुंबई लिलो ट्रान्समिशन लाइन आणि २२० केव्ही आपटा – तळोजा लिलो ट्रान्समिशन लाइन. पारेषण नेटवर्क पडघा, अंबरनाथ, कल्याण, तळोजा, खारघर आणि पनवेल या क्षेत्रांमधून जाते.
मुंबई ऊर्जा मार्गचे प्रकल्प संचालक, निनाद पितळे म्हणाले की, “कार्यान्वित झाल्यावर मुंबई ऊर्जा मार्ग पारेषण प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, कारण प्रदेशातील लोक आणि उद्योगांसाठी त्याचे व्यापक फायदे मिळू शकतील. त्यामुळे ऊर्जेची उपलब्धता वाढेल, यंत्रणेवरील अवलंबित्व आणि सुरक्षितता वाढेल, राज्यासाठी अधिक स्वस्त व हरित ऊर्जा मिळवण्यासाठी लवचिकताही मिळू शकेल.”नवी मुंबईतील खारघर पनवेल प्रदेशातील विजेची मागणी सातत्याने वाढते आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातून विश्वासू आणि अखंड वीजपुरवठा झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांच्या महत्त्वाकांक्षांना बळ मिळेल. त्यातून मुंबई महानगर प्रदेशात एकूणच नोकऱ्या, वाढ आणि भरभराट होऊ शकेल.