नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राहत्या घराचे वीज बिल तब्बल सात ते आठ पटीने पाठवून वीज ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या वीज कंपनी विरोधात गुरुवारी खारघर मधील वीज ग्राहकांनी संताप व्यक्त करित हल्लाबोल केला.
मागील एक महिन्यापासून वाढीवविज बिलांचा प्रश्न गंभीर झाला आहे. लॉक डाऊन काळात नागरिकांना भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मीटर रिडींग न करता अंदाजे सरासरी बिले पाठविण्यात आली आहेत. ज्यांचे बिल महिन्याला एक हजार येत होते त्यांना ५ हजार रुपये आणि ज्यांना आठ हजार येत होते त्यांना ६० हजारहुन अधिक बिल पाठवले आहे. वीज कंपनीच्या अशा अनागोंधी कारभाराचा जाब विचारण्यासाठी अनेक वीज ग्राहक गुरुवारी खारघर सेक्टर १२ येथिल कार्यालयात पोहचले. वीज ग्राहकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वीज ग्राहक संतापले. त्यामुळे काही काळ गोंधळ मजला. दरम्यान, वीज कंपनीने वाढीव बिले कमी करून नियमित कायदेशीरपणे बिले वसूल करावीत अशी मागणी खारघर येथील रहिवाशी सुरज म्हात्रे आणि उपस्थित सर्व नागरिकांनी वीज कंपनीकडे केली. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे
कोकण दर्पण