पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने राज्यातील बंद असलेली महाविद्यालये सुरु केली आहेत. कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड लसीकरण देखील मोठ्याप्रमाणात राबविले जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालयांमध्ये कोविड लसीकरण मोहीम सुरु आहे. त्याअनुषंगाने खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये कोविड लसीकरण विशेष शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उदघाटन रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. निलेश कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आय क्यू ए सीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, एनएसएस विभाग अधिकारी प्रा.रोहित पाटील, डीएलएलइ विभागप्रमुख प्रा. महेश धायगुडे तसेच पनवेल मनपाच्या डॉ रंजना बोर्डे आदी उपस्थित होते. सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रा. राहुल कांबळे, प्रा.महादेव चव्हाण, प्रा. सानिया नाचन, प्रा. भरत सोलंकी आणि प्रा. सुहास धानवे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कॉलेजच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतला. कोविड लसीकरण शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केल्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि संस्थेचे सचिव डॉ सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.