Press "Enter" to skip to content

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी केली नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी !

नवी मुंबई : डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी 01 ऑक्टोबर 2021 रोजी नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची अंमलबजवाणी आणि येत असलेल्या अडचणीं संदर्भात चर्चा केली.

“पूर्व किनारा जलवाहतूक प्रकल्पांतर्गत नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच येथून प्रवाशांकरिता बोट आणि कॅटमरान सेवा सुरू होणार आहे. यामुळे रस्ते व रेल्वे मार्गांवरील ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे..”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

केंद्र शासनाच्या अंतर्गत जलवाहतूक विकास धोरणांतर्गत महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर अंतर्गत जलवाहतूकीच्या नियोजन आणि अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाची (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) नियुक्ती केली आहे. या अंतर्गत मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ आणि अलिबाग जवळील मांडवा येथे अनुक्रमे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको आणि महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जलवाहतूकीकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यानुसार सिडकोकडून नेरूळ येथे जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे.

सदर जलवाहतूक टर्मिनल हे एनआरआय संकुलाच्या पूर्वेस, नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पश्चिमेस असून उत्तरेकडून पाम बीच मार्गाद्वारे त्यास संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर स्पीड बोट/कॅटमरान सेवेचे परिचालन महाराष्ट्र सागरी मंडळाकडून करण्यात येणार आहे.

सदर जल वाहतूक टर्मिनल हे पनवेल खाडीमध्ये स्थूणाधारित फलाटावर (पाईल्ड् प्लॅटफॉर्म) उभारणे प्रस्तावित असून पोच मार्ग (ॲप्रोच रोड), पोच धक्का (ॲप्रोच जेट्टी), टर्निंग प्लॅटफॉर्म, तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून), लिंक स्पॅन, ब्रिदींग डॉल्फिन्स, इलेक्ट्रिक पॅनल रूम, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, नेव्हिगेशन एरिया, मार्शलिंग एरिया इ. सुविधाही पाईल्ड् प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात येणार आहेत. टर्मिनल अंतर्गत प्रतीक्षालय, रिफ्रेशमेन्ट एरिया, किचन व फुड काउन्टर, तिकीट काउन्टर, लगेज चेकिंग एरिया, स्वच्छतागृहे, बहुउद्देशीय सभागृह, फुड कोर्ट इ. सुविधाही समाविष्ट आहेत.

नेरूळ जलवाहतूक टर्मिनल येथून बोट सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळण्याबरोबरच निसर्गरम्य सागरी प्रदेशाचे अवलोकन करण्याची संधी मिळणार आहे. नेरूळ ते भाऊचा धक्का हे 11 सागरी मैलाचे अंतर स्पीड बोट व कॅटमरानद्वारे केवळ 30 ते 45 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबई, दक्षिण मुंबई व पुढे अलिबाग पर्यंतच्या प्रवासाच्या वेळतही लक्षणीयरीत्या बचत होणार आहे. जलवाहतूकीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते व रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »