नवी मुंबई : सिडको महामंडळाकडून 4 स्वतंत्र योजनांतर्गत अर्थार्जन करणाऱ्या महिलांकरिता वसतिगृहे, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) अशा विविध सामाजिक उपक्रमांकरिता, नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये एकूण 14 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एकूण 14 भूखंडांपैकी महिला वसतिगृहाकरिता 4, संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता एका योजने अंतर्गत 3 व दुसऱ्या योजनेंतर्गत 5 आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) उपक्रमाकरिता 2 भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
“नवी मुंबईच्या भौतिक विकासबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासही सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. चार स्वतंत्र योजनांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थार्जन करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह यांसारख्या उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणासही हातभार लागणार आहे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडको महामंडळाकडून, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने विकास प्रकल्पांबरोबरच सामाजिक उद्देशांकरिताही भूखंड भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात येतात. या वेळेस 4 स्वतंत्र योजनांतर्गत अर्थार्जन करणाऱ्या महिलांकरिता वसतिगृहे, संयुक्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) या सामाजिक उपक्रमांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थार्जन करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाकरिता घणसोली, कोपरखैरणे, उलवे व खारघर येथील प्रत्येकी 1 याप्रमाणे 4 भूखंड उपलब्ध आहेत. संयुक्त शाळा आणि महाविद्यालयाकरिता एका योजने अंतर्गत सर्वसाधारण संस्थांसाठी सानपाडा येथे 1 व द्रोणागिरी येथे 4 असे 5 तर दुसऱ्या योजने अंतर्गत नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांसाठी वाशी, द्रोणागिरी व उलवे येथील प्रत्येकी 1 भूखंड याप्रमाणे 3 भूखंड उपलब्ध आहेत. उच्च शैक्षणिक उपक्रमांकरिता (व्यावसायिक महाविद्यालय) उपक्रमाकरिता खारघर व घणसोली येथील प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 भूखंड उपलब्ध आहेत. सदर 14 भूखंड हे 858.30 चौ.मी. ते 12,196.40 चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत.
भूखंड विक्रीच्या सदर चारही योजनांची अर्ज करण्याची तारीख, अनामत रक्कम, शुल्क इ. माहिती जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.