नवी मुंबई : थोड्या वेळेसाठी पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळेही सीबीडी कॉलनीतील सेक्टर ४, ५ व ६ मधील व्यापारी वजा रहिवाशी संकुलांमधील सार्वजनिक जागेत २ ते ३ फूट पाणी साचते. ज्याला सीबीडी मधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी वर्षानुवर्षे महापालिकेच्या होल्डिंग पॉण्डमध्ये साचलेल्या गाळाकडे केलेले दुर्लक्ष व सदरहू गाळ काढण्यासाठी सातत्याने न केलेला प्रयत्न जबाबदार असल्याचे टिकास्त्र नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे पाणी साचून, सीबीडी सेक्टर ४, ५ व ६च्या मार्केटमध्ये पाणी साचून व्यापारी आणि स्थानिक रहिवाश्यांच्या आर्थिक आणि वित्तीय नुकसानीला कारणीभूत ठरणाऱ्या, सिडको निर्मित मात्र सध्या स्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या बेलापूर सेक्टर ११ येथील होल्डिंग पॉंडमधील गाळाचा उपसा वर्षानुवर्षे न झालेला नाही. ज्यासाठी, महापालिकेतील संबंधित विभाग आणि स्थानिक माजी नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळाने सदर होल्डिंग पॉन्डचा पाहणीदौरा आज १० नोव्हेंबर रोजी केला. त्यावेळी गावडे यांनी हा आरोप केला आहे.
तर, सीबीडीतील रहिवासी आणि नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष धनाजी खराडे आणि समाजसेविका डॉ. ज्योती खराडे यांनी सदर होल्डिंग पॉन्डच्या पंपहाऊसची आवश्यक दुरुस्ती व येथील गाळ काढण्यात यावा म्हणून, महापालिकेच्या आयुक्तांकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. ज्यामुळे, येत्या काही दिवसांमध्ये सदर पॉन्डच्या पंपहाऊसच्या दुरुस्तीचे काम व म्यांग्रोज सुरक्षित ठेवून जमेल तितका गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती धनाजी खराडे यांनी पाहणीदौऱ्यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.
आजच्या पाहणीदौऱ्यावेळी स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी हस्तीमल जैन, राष्ट्रवादीचे सीबीडी तालुका अध्यक्ष अरुण कांबळे, कार्यध्यक्ष मंदार घोलप, युवक तालुका अध्यक्ष प्रशांत तिडके, जिल्हा सचिव विजय नाईक, समाजसेवक विनय मोरे, जसपाल सिंग अटवाल, सुरेंद्र भोसले, सेक्टर-४ बी-१० सेक्रेटरी शरद घोडके, सेक्टर-४ सरगम अपार्टमेंट सदस्य सुहास उतळे, सेक्टर-५ निलगिरी अपार्टमेंट सेक्रेटरी दिलीप आंदळकर, एफ टाईप असोसिएशन सेक्रेटरी मेहरा, सेक्टर-६ वर्षा अपार्टमेंटचे सेक्रेटरी गावडे, स्थानिक रहिवाशी पी.एमी.कांबळे, रवी शहा, कांबळे सर, नामदेव राठोड, पिंटू अण्णा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.