पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, सदर प्रश्न तातडीने सोडवावा, अपुऱ्या प्रमाणात होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा,
अशी मागणी स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.
खारघर मधील प्रभाग क्र. ४ मधील से १९ ,२० ,२१ व ११ ,१३ येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा हा एकतर कमी दाबाने किंवा मागणी पेक्षा कमी होत आहे. सध्य स्थितीत पावसाळा सुरू आहे व तोही मोठया प्रमाणात असतांना पाण्याचा तुटवडा कसा ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोसायटीतील पदाधिकारी वेळोवेळी करीत आहेत. प्रामुख्याने महिला भगिनींना सदर प्रश्न भेडसावत आहे. याबाबत सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग ,खारघर यांना फोन केला की ते किंवा त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी येतात व सोसायटीत आल्यानंतर पाण्याचे मीटर चेक करतात अथवा पाणी पाईपलाईन तपासतात त्यावेळे पुरते पाणी व्यवस्थित येते परत ये रे माझ्या मागल्या असे होतांना दिसून येत, असल्याचे नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सांगितले. सदरचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी लेखी मागणी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे नेत्रा पाटील यांनी केली आहे.
कोकण दर्पण