नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सोसायटी आवारात आढळून येणाऱ्या कोरोना रूग्णांची माहिती पूर्वीप्रमाणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मोबाईलवर कळवावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका प्रशासन पूर्वी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात कोरोना रूग्ण आढळून आल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर माहिती पाठवून कळवत असे. त्यामुळे सोसायटी आवारातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोसायटीतील रहीवाशांना कोरोना रूग्णांबाबत माहिती उपलब्ध होवून सर्व रहीवाशी काळजी घेत असत. मात्र गेल्या काही दिवसापासून महापालिका प्रशासनाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाठविणे बंद केले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.
डॉक्टरांना आम्ही होम क्वारन्टाईन होतो असे सांगून रूग्ण घरी थांबणार असल्याची पालिका प्रशासनाला कल्पना देतात. मात्र आपल्या गृहनिर्माणस सोसायटी आवारात कोणाला कोरोना झाला आहे, याबाबत सोसायटीच्या रहीवाशांना व पदाधिकाऱ्यांना कल्पना नसते. कोरोना रूग्ण खरोखरीच होम क्वारन्टाईन झाला आहे अथवा नाही, त्याच्या घरातील उर्वरित लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे अथवा नाही याबाबत पालिका प्रशासन कोणतीही खातरजमा करत नाही. त्यामुळे अनेक भागात कोरोनाग्रस्त होम क्वारन्टाईन झाल्यावर अनेकदा कंटाळा आल्यावर सोसायटी आवारात तसेच परिसरात फिरत असतात. एकप्रकारे ते कोरोना संक्रमणाचे काम करतात. सोसायटी आवारात कोणाला कोरोना झाला आहे, याबाबत कोणालाही माहिती नसल्याने रहीवाशांना प्रतिबंधात्मक काळजीही घेता येत नाही, त्यामुळे परिस्थिती अवघड होवून बसली आहे. महापालिका प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून कोरोना रूग्णांची माहिती होईल, इतरांना माहिती पडल्यामुळे कोरोना रूग्ण खऱ्या अर्थाने होम क्वारन्टाईन होईल व इतरांनाही त्यापासून धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे कोरोनाबाबतच्या समस्येचे गांभीर्य पाहता तात्काळ आपण संबंधितांना पूर्वीप्रमाणेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांविषयी मोबाईलवर माहिती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी
मागणी अशोक गावडे यांनी केली आहे.
कोकण दर्पण