नवी मुंबई : कोव्हीड काळातील दुसरी दिवाळी आपण साजरी करत असून सध्या कोव्हीडचा प्रभाव कमी झालेला दिसत असला तरी कोव्हीड अजून संपलेला नाही याचे भान राखून कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाज माध्यमांव्दारे नागरिकांशी साधलेल्या संवादातून केले आहे.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्स तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या अनुषंगाने संभाव्य तिस-या लाटेत रुग्णसंख्या जरी अधिक असली तरी सुविधांची कमतरता भासायला नको म्हणून महानगरपालिकेने बेड्स, व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन याची तयारी केलेली आहे. याशिवाय तिसरी लाट येऊच नये किंवा आली तरी तिची तीव्रता कमी रहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर व नियोजनबध्द रितीने कोव्हीड लसीकरण कार्यक्रम राबविला आहे. लसीकरणाला नागरिकांनी दिलेल्या उत्तम सहकार्यामुळे पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्यात आले असे आयुक्तांनी म्हटले आहे.
सध्या रुग्णस्थिती ब-याच प्रमाणात सामान्य झालेली दिसते. प्रतिदिन पॉझिटिव्ह केसेसचे साप्ताहिक प्रमाणही कमी झालेले आहे. तसेच प्रत्येक महिन्यात शून्य मृत्यूचे दिवस वाढताना दिसत आहेत. म्हणजेच मृत्यूदर नियंत्रणात येताना दिसतो आहे. कोव्हीडची परिस्थिती काहीशी सामान्य झाल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. या दिवाळीला 'कोव्हीडनंतरची दिवाळी' असे म्हटले जात आहे. मात्र 'कोव्हीडनंतरची' हा शब्द इतक्यातच वापरणे जरा घाईचे होईल असे सांगत आयुक्तांनी जागतिक स्थितीचा व आरोग्य तज्ज्ञांच्या टिप्पणीचा उल्लेख करीत तिसरी लाट टाळण्यासाठी कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
जगभरातील परिस्थिती पाहिली असता 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेल्या व काही प्रमाणात बुस्टर डोस पूर्ण केलेल्या इस्त्राईल सारख्या देशात लसीकरणानंतरही कोव्हीडची मोठी लाट येऊन गेली. त्याचप्रमाणे युरोप मध्येही मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. ही परिस्थिती पाहता लसीचे दोन्ही डोस घेतले तरी व्यक्ती पॉझिटिव्ह येऊ शकते हे लक्षात घेऊन एका बाजुला आपण उत्सव साजरा करण्याच्या मनस्थितीत असलो तरी कोव्हीडमधून आपण संपूर्ण बाहेर पडलेलो नाही या गोष्टीचे भान राखूनच उत्सव साजरा करावा असे आयुक्तांनी सूचित केले आहे.
गणेशोत्सवानंतर तिसरी लाट येतेय की काय? या दडपणाखाली नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले व आपण तरून गेलो. मात्र त्यामुळे आता जरा निष्काळजीपणा केला, परिस्थिती सामान्य झाली आहे असे समजलो आणि सुरक्षा नियमांचे पालन केले नाही तर त्यामुळे तिसरी लाट आली असे व्हायला नको म्हणून प्रत्येकाने दक्षता राखणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
लसीकरण झाले म्हणजे आपण कोव्हीडपासून सुरक्षित झालो अशा अविर्भावात राहणे आरोग्यदृष्ट्या धोक्याचे असून पहिल्या लाटेमध्ये तोंडावर मास्क असणे जेवढे गरजेचे होते तेवढेच लसीकरण झाले असले तरी आजही गरजेचे आहे हे काळजीपूर्वक लक्षात घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले आहे.नवी मुंबईमध्ये लसीकरणाचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला असला तरी दोन्ही डोस जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोव्हीडपासून प्रभावी संरक्षण मिळत नाही. त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित असेल आणि दुसरा डोस घेण्याचा विहित कालावधी पूर्ण झाला असेल अशा नागरिकांनी त्वरीत आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन कोव्हीडचा दुसरा डोस विनामूल्य प्राप्त करून घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. यामध्ये पहिला डोस नवी मुंबई बाहेर घेतला असेल किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये घेतला असेल अथवा कुठल्या शिबिरात घेतला असेल तरीही दुसरा डोस नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर विनामूल्य घेता येईल असे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले आहे.