Press "Enter" to skip to content

७ नोव्हेंबर राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा ! महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद !

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ०७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी येथे केली.
मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, 06 डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे. 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 07 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कारण याच दिवशी 1900 साली बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. मला असे वाटते की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय पातळीवरील डॉ.आंबेडकरांच्या शिक्षण विषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करुन देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करीन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडन मधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकरला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी आताच स्मारकाला भेट दिली तेव्हा केली आहे.त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या उपक्रमामध्ये मी ही सहभागी होऊ इच्छ‍ितो. त्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यपाल विवेकानुदान निधीतून 30 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते यांनी बाबासाहेबांचे बालपण, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, आंबडवे गावाची पार्श्वभूमी, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या शाळेच्या माध्यमातून केले जाणारे शैक्षणिक काम याविषयीचे विवेचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात व सांगता पोलीस बँड पथकाने राष्ष्ट्रगीताची धून वाजवून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुप्रसिध्द निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, प्रांतधिकारी प्रवीण पवार, प्रांतधिकारी शरद पवार, तहसिलदार, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच प्रशासनातील इतर विभागाचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, आंबडवे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »