पनवेल : सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात पार पडलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात १ हजार पनवेलच्या लेकींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत या महाशिबीराला उदंड प्रतिसाद लाभला.
दोन दिवसीय या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली (दि. ०२)आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबिराच्या उत्तम नियोजनाबद्दल नामदार भारती पवार यांनी भरभरून कौतुक केले होते. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या ‘हाय रिस्क’ प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या पुढाकाराने सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरच्या निर्मूलनासाठी या लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे शिबिराच्या पहिल्या दिवशी ४४४ तर दुसऱ्या दिवशी ५५६ मुलींचे लसीकरण होऊन १ हजार मुलींना याचा लाभ मिळाला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन आणि महिला मोर्चाने विशेष मेहनत घेतली.