पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा गावातील रस्त्याची वर्षभरात दाणादाण उडाली आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता वर्षभराच्या आत सदर रस्ता खड्ड्यात गेला आहे, त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना भयंकर त्रास होत आहे. जनतेचा पैसे पाण्यात घालविणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, आणि सदर रस्ता नव्याने बनवावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तळोजा गाव हे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मोठे गाव आहे. तळोजा गावच्या प्रवेशद्वाराजवळच सिडकोचा मोठा गृप्रकल्प उभा राहिला आहे. अनेक मोठ्या खाजगी वसाहती उभ्या होत आहेत. येथील लोकवस्ती मोठ्या झपाट्याने वाढत आहे.मात्र, तळोजा गाव ते सेक्टर ४० मधील बागे गृहसंकुल पर्यंतचा संपूर्ण रास्ता उखडला आहे. तळोजा गावात जाण्यासाठी हाच मुख्य रास्ता आहे. मात्र, रस्त्याची पूर्णता चाळण झाली आहे. रस्ता पूर्ण खड्यात गेला आहे. खड्यात रस्ता कसा शोधायचा असा प्रश्न नागरिकांना आणि वाहनचालकांना हदला आहे. वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे, रस्त्याची विचित्र स्थिती झाल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिडकोचा मोठा गृह प्रकल्प येथे आहे. मात्र सिडकोने देखील रस्ता बांधलेला नाही. तळोजा गावात जाणारा ब्रिज देखील धोकादायक बनला आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याचा धोका अधिक आहे.
तळोजा गावातील सदर रस्ता पालिकेने मागील वर्षी बनवला होता, मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता वर्षाच्या आतमध्ये उखडला.त्यामुळे सदर गंभीर प्रश्नाची दखल घेऊन जनतेचा पैसा खड्यात घालणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी आणि पालिकेने सदर रस्ता नव्याने बांधून तळोजावासी आणि सेक्टर ४० मधील नागरिकांना रस्ताच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पनवेल मनपा आयुक्तांकडे केली आहे.