श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात !
नांदेड : पत्रकारिता हे क्षेत्र आज समाजाचा अविभाज्य अंग बनला आहे. सध्याच्या संक्रमणाच्या काळात कितीही बदल होत असले, दिवसागणिक रोज नवनव्या उलथापालथी होत असल्याच्या बातम्या कानावर पडत असल्या तरी आजही समाजामध्ये अनेक पत्रकारांची प्रतिमा उज्वल आहे. त्यामुळे समाजाभिमुख, निष्पक्ष, निर्मोही आणि वंचित- उपेक्षितांसाठी पत्रकारिता करणार्या पत्रकारांचा आदर्श घ्या, असा उपदेश राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था एफ.टी.आय.आय.चे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी पदवीदान समारंभात केला.
नांदेड येथील श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी एफडीआय पुणे येथील संचालक भूपेंद्र कैंथोला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पदवीदान समारंभाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथील डॉ. राकेश कुमार मिश्र, डॉ. संदीप सपकाळे, डॉ. शैलेश कदम, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार, जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद भोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी विद्यापीठ ध्वजसंचलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांची प्रतिमा पूजन करून सामूहिक विद्यापीठ गीत गायन करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ.टी.आय.आय.चे संचालक भूपेंद्र कैंथोला म्हणाले, आजच्या काळामध्ये नेमकी पत्रकारिता करणे कठीण आहे. परंतु हा कठीण मार्ग तुम्ही विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे, त्याबद्दल मी मनःपूर्वक कौतुक करतो. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक आणि वैचारिक पत्रकारिता करून समाजामध्ये ‘स्वातंत्र्य’ अबाधित राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पत्रकारिता क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, हे मान्य असले तरी स्पर्धेसाठी कोणत्याही अविवेकी मार्गाचा अवलंब करणे चुकीचे असून इतर करतात म्हणून त्यांच्यासारखे आपण पत्रकारितेचे कार्य करणे धोक्याचे आहे, असा त्यांनी कानमंत्र दिला. पत्रकारितेत काही लोक शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यामुळे एखादवेळ एखादी गोष्ट हाती लागू शकते. परंतु लांबचा पल्ला गाठण्यासाठी शॉर्टकट कधीही कामी येत नाही, असेही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात मत व्यक्त केले.
प्राचार्य विकास कदम यांनी महाविद्यालयाच्या तेरा वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर करून अध्यक्षीय समारोप केला.
पदवीदान समारंभासाठी महाविद्यालयातील प्रा. अमोल धुळे, प्रा. विपीन कदम, प्रा. संजय नरवाडे, प्रा जगदीश केंद्रे, महाविद्यालयातील सौ. शारदा कुलकर्णी, सचिन भदरगे,.कुणाल भुरे, कुलदीप राक्षसमारे आदींनी पुढाकार घेतला होता. शेवटी राष्ट्रगीताने पदवीदान समारंभाची सांगता झाली.