पनवेल : कर्मवीरभूमी (हरेश साठे) थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करत रयतला भरभरून दिले आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हि आमची जबाबदारी आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरदराव पवार यांनी (सोमवार, दि. २७) सातारा येथे केले.
तन, मन, धनाने शिक्षण क्षेत्राला सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अफाट कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सुविधायुक्त अशा ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ चे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात समारंभपूर्वक झाले. कर्मवीरांच्या भूमीत आजचा दिवस समस्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा होता, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात समाजसेवकाची भूमिका बजावली. आणि हा सोहळा डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवण्यासाठी राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते. या समारंभपूर्वक हृद्य सोहळ्याने सर्वच जण भारावून गेले होते. संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी झाला होता. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार शरदराव पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष ऍड. भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, कायदेशीर सल्लागार ऍड. दिलावर मुल्ला, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मीनाताई जगधने, ऍड. रवींद्र पवार, राजेंद्र फाळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ठाकूर कुटुंबीय त्याचबरोबर संस्थचे जनरल बॉडी सदस्य अरूणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक,नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आणि हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार शरदराव पवार यांनी म्हंटले कि, ज्या भूमीत शिक्षण घेऊन मोठे कर्तृत्वान झाले त्या भूमीला रामशेठ ठाकूर विसरले नाही, त्यांच्या नावाने साताऱ्यात भवन उभारले आहे आज त्याचे उद्घाटन झाले, त्यामुळे आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आणि आनंददायी दिवस असल्याचे सांगतानाच रामशेठ यांच्या कडून संस्थेच्या विकासासाठी कधीही नकार शब्द आला नाही, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा असल्याचा शरदराव पवार यांनी आवर्जून उल्लेख केला. संस्थेत जेव्हा कोणतेही प्रकल्प करायचा असेल त्यावेळी रामशेठ यांचे नाव येत नाही तो पर्यंत काम पूर्ण होत नाही असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर रामशेठ ठाकूर रयतेचे खरे हितचिंतक आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. रायगड जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्या जिल्ह्यामध्ये अनेक कर्तृत्वान लोकं पुढे आली. दि. बा. पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचे नाव घेता येईल पण या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये जोपर्यंत यात रामशेठ ठाकूर यांचे नाव येत नाही तो पर्यत ते पूर्ण होत नाही. ,असे शरदराव पवार यांनी म्हंटले. संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांनी कधीही कसूर केला नाही वेळोवेळी मदत केली. रायगड, नवी मुंबई, त्याचबरोबरीने राज्यातील विद्यालयांना कोटीच्या कोटी रुपयांनी मदत केली आहे असे सांगतानाच शरदराव पवार यांनी मदतीची मोठी यादी वाचताना रामशेठ ठाकूर यांनी केलेली मदत म्हणजेच रयतला सर्वस्व अर्पण केले असल्याची प्रतिक्रिया देत रामशेठ ठाकूर यांचे योगदान अनन्य साधारण असल्याची पोचपावती दिली. कर्मवीर अण्णांनी शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेमहाराज यांचे विचार मनात आत्मसात करून वाटचाल केली, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्शाचा वारसा पुढे चालविण्याचे काम होत आहे. व्यक्तिमत्व घडविण्यासाठी निष्ठा, नाते, बांधिलकी लागते, आणि त्यातूनच समाजाप्रती भावना निर्माण होतात, रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उदार मनाने कार्य केले आहे, त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक जडणघडणीत रामशेठ यांचा सहभाग महत्वाचा आहे असे सांगतानाच रामशेठ आणि मी रयतच्या विकासासाठी काम करीत राहू, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या उभारणीत आणि यशात मोठे योगदान असल्याचे प्रांजल कबुली दिली.
रामशेठ म्हणजे देणगीची खैरात – खासदार श्रीनिवास पाटील
रामशेठ ठाकूर हे माझे मित्र आहेत. प्रत्येक व्यक्ती शेवटी रिकाम्या हाती जातो पण रामशेठ यांनी एवढे कर्तृत्वाने कार्य केले आहे कि ते भरल्या हातानेच राहणार आहेत. रामशेठ यांच्या शब्दात ताकद आहे. रामशेठ म्हणजे देणगीची खैरात आहे, त्यामुळे रामशेठला कशाचीही भीती नाही. आम्हाला कोटीवर किती शून्य असतात ते लिहता येत नाही पण रामशेठ कोटीच्या कोटी देणगी देतात. असे श्रीनिवास पाटील यांनी सांगतानाच ‘जय हो राम’ अशी गर्जना केली आणि या माझ्या मित्राचे वैभव आणि दानशूरपणाने डोळ्यात आनंदाश्रू वाहत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर रयतेचे एटीएम – डॉ. अनिल पाटील – चेअरमन, रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज आहे. आणि या महाविद्यालयात रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण घेतले आणि ते कर्तृत्वाने मोठे झाले त्यांच्या नावाने येथे भवन उभारले आहे, त्याचा आम्हा सर्व रयतसेवकांना अत्यानंद आहे. येथील प्रत्येक वास्तू पुण्यवान व्यक्तीची आहे, त्यामुळे रामशेठ यांच्या नावाचे भवन भावी पिढीचे भविष्य घडविणारी वास्तू आहे. रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या जडणघडणीत भरभरून दिले आहे. प्रत्येक हाकेला साद त्यांनी दिली आहे. पवारसाहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नसून लोकनेते रामशेठ ठाकूर रयतेचे एटीएम आहेत.
‘राम’ चा रामशेठ रयतमुळे – लोकनेते रामशेठ ठाकूर
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे ज्यांनी आत्मसात केले तो व्यक्ती मोठा झाला आहे. रयत शिक्षण संस्था माझे घर आहे. कर्मवीर अण्णांची कृपादृष्टी झाली नसती तर आम्ही सुशिक्षित झालो नसतो. आम्हाला पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले आहे, त्यामुळे ‘राम’ चा रामशेठ रयतमुळे झाला आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रयत शिक्षण संस्थेत काम करीत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांचे सातत्याने संस्थेला मार्गदर्शन लाभते. मी त्यांच्या सोबत राजकारणात गेलो नाही पण त्यांचा शिक्षण क्षेत्राचा आदर्श घेऊन वाटचाल केली. अण्णांचा आशीर्वाद आणि पवारसाहेबांची साथ यामुळे शिक्षण क्षेत्रात वाटचाल सुरु आहे. अण्णांच्या आपुलकीने विशेष संस्कार घडले. त्यामुळे आपल्याकडे असलेला काहीतरी भाग समाजासाठी द्यावा, हि कायम ईच्छा असते, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ऋण फेडू तेवढे कमी आहेत. आजचा समारंभ माझ्या आयुष्यातील मोजक्या पाच दहा समारंभापैकी एक आहे. रयतेचे आपल्यावर अफाट उपकार आहेत, त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी यापुढेही आपले सहकार्य राहील.
चौकट-
रयत शिक्षण संस्थेच्या कुंभोज येथील विद्यालयाच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ०१ कोटी २५ लाख रुपये व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी ०१ कोटी २५ लाख रुपयांची अशी एकूण २कोटी ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती ती या सोहळ्यात धनादेशाद्वारे संस्थेचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थेच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर व शकुंतला ठाकूर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
चौकट-
कमालीची लोकप्रियता असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांची राजकारणी पेक्षा समाजकारणी म्हणून समाजात प्रतिमा आहे. दानशुर व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. दररोज हजारो लोक त्यांना भेटण्याकरीता येतात. त्यामध्ये अडचणींची सोडवणुक करण्याबरोबरच मदतीच्या अपेक्षेने अनेक जण येतात. आणि त्यांच्याकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही. अनेकांचे अश्रु पुसण्याचे काम ते करतात. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रमघेण्याची तयारी या गुणांचे बाळकडू त्यांना लहान वयातच आई-बाबांकडून मिळाले होते. त्यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना आपल्या अंतरमनात शिक्षणाविषयीची आस त्यांनी जागृत ठेवली. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील विद्यालयात त्यांनी ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वाने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिक्षणाची जाण ठेवत रयत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने मदतीचा हात देऊ केला आहे. आज त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत असून रयत शिक्षण संस्थेनेही त्यांचे नाव अनेक विद्यालयांना देऊन त्यांच्या कार्याची पावतीच दिली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था हि त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे. मात्र त्यांनी या संस्थेपेक्षा रयत शिक्षण संस्थेच्या विकासाला अधिक महत्व दिले. आणि रयत शिक्षण संस्थेला कायम मातृसंस्था मानून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वाटचाल सुरु आहे. रयत शिक्षणाच्या विकासासाठी हाक दिल्यानंतर प्रत्येकवेळी त्या हाकेला प्रतिसाद देऊन रयत शिक्षणाच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान समाजाला आदर्श देणारे आहे. केवळ समाजासाठी जगणारे लोकमान्य लोकनेता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असून सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी, प्रामाणिकपणा, अचूक निर्णय क्षमता, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा या गुणांमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची महती देशभरात आहे. रयतेच्या स्वप्नांचे शिल्पकार ठरलेले कर्मवीर अण्णांचा आदेश डोळ्यासमोर ठेवून आपले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम सुरू ठेवले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व रायगड विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीचे कर्तव्य भावनेत रूपांतर करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई व रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयीसुविधा युक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सदोदित दर्शन घडवत रयतेचे शैक्षणिक काम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचे काम असे समजून सदैव त्यात झोकून देवून शैक्षणिक प्रगतीची दारे त्यांनी सर्वांना खुली केली. त्यांच्या अफाट कार्याची दखल घेत सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ लोकार्पित झाले आहे आणि भावी पिढीसाठी हि आदर्श वास्तू प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी तसेच तमाम रयत सेवकांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, इतिहासात ज्या थोर व महनीय व्यक्तींनी आपल्या कर्तुत्वाने नवी दिशा दिली. त्या व्यक्तीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्वाचे आहे. आशिया खंडात नावजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून “कमवा व शिका” योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे दातृत्वाचा नवा सर्वोच्च अविष्कार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रचिती आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तुत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य असणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेच्या लहान मोठ्या शाखांचे व रयत सेवकांचे आदर्श आहेत. एकुणच महाराष्ट्राच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकनेते या पदाला पोहचलेल्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ़याच व्यक्ती आहेत त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आदराने नाव घेतले जाते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतिशील विचारांचा समृद्ध वारसा पुढे चालवित आहेत. त्यांच्यातील दातृत्व या असामान्य गुणामुळे संपूर्ण महाराष्टाच्या जीवनात आदरयुक्त स्थान आहे. साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांनी अंगिकारलेले तत्व सर्वांना प्रेरणादायी ठरत आहेत, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाचा यावेळी सन्मान होताना अभिमानाने उपस्थितांचे ऊर भरून आले होते.
असे आहे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’
‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ हे छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आहे. या भवनाची इमारत आकार ३६ हजार स्केअर फूट असून, हि इमारत पार्किंग व चार मजली आहे. यामध्ये २८खोल्या आहेत. तसेच प्रशस्त सभागृह, रिसर्च सेंटर, पदव्युत्तर विभाग, मिडिया अँड इन्टरटेन्टमेंट स्टुडिओ, कॉम्प्युटर लॅब आहे. त्याचबरोबर फायर सिस्टीम, लिफ्ट, अशा विविध आधुनिक सुविधा या भवनात आहेत.