पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील अनेक वर्षांपासून तळोजा शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या सात दिवसांपासून कमी दाबाच्या तांत्रिक करण्याच्या नावाखाली तळोजा फेज १ व फेस २ येथील नागरिकांना एक थेंबही पाणी मिळाला नाही. त्यामुळे पाणी समस्येने त्रस्त झालेल्या तळोजामधील अनेक सोसायटीमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सिडकोने याबाबत गंभीर दाखल घेऊन पाणी प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद पाटील यांनी सिडको व एमआयडीसीकडे पाठपुरावा केला. एमआयडीसी कडून कमी दाबाचे पाणी येत असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही, असे उत्तर सिडकोकडून देण्यात आले. मात्र, आम्ही मुबलक दाबाचे पाणी सिडकोला दिले आहे. पाणी वितरणाची जबाबदारी ही सिडकोचे असल्यामुळे आम्ही सदर पाणी टंचाईला जबाबदार नाही, असे एमआयडीसीचे म्हणणे आहे. मात्र, दोघांच्या वादात कोण खरे बोलतोय हे जनतेला कळले नाही. पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत आहे.
तळोजाचा पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष गंभीरच आहे परंतु यावर्षी अजून पावसाळा संपला नाही तरी जनतेचे हे हाल शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे होत आहे. पाण्याच्या प्रश्नावर येथील शहरातील जनता अनेक वेळा रस्त्यावर उतरली परंतु राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून जी आश्वासने देण्यात आली ती फोल ठरली आहे. येथे राहण्यास आलेल्या रहिवाशांकडून आता सदनिका विकून दुसरीकडे राहायला जावे कि काय अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.
सदर पाणीटंचाईला टँकर लॉबी व व पाण्यात संबंधित अन्य भ्रष्टाचार होत असल्याची शंका येथील स्थानिक जनतेकडून होत आहे.
कोकण दर्पण