अलिबाग : पर्यावरणाच्या समस्येमुळे मानवी जीवनाची अपरिमित हानी होते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगिकारून घर, परिसर स्वच्छतेबरोबर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता ठेवावी. प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. समुद्रकिनारे स्वच्छ व प्लास्टिकमुक्त राहण्यासाठी पर्यटक व ग्रामस्थ यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून वरसोली ग्रामपंचायतकडून आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी दरमहा पहिल्या आठवडयात अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये अशी मोहीम आयोजित करणार असल्याचे सांगितले. तसेच अलिबाग मधील समुद्र किनाऱ्यावरील गावांमधील समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी जाळीदार फावडे वापरण्याबाबत सूचना दिल्या.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. जयवंत गायकवाड यांनी “स्वच्छता ही सेवा” या अभियानाची माहिती उपस्थितांना दिली.
वरसोली ग्राम पंचायत सरपंच सौ. प्रमिला भाटकर, उपसरपंच श्री. मिलिंद कवळे, ग्रामविकास अधिकारी श्री. दिनानाथ म्हात्रे यांनी श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते.
वरसोली बीचवरील स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायतीचे कर्मचारी, रायगड जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रोटरी क्लब अलिबागचे सदस्य, रोट्रॅक्ट क्लब अलिबाग सदस्य, कुलाबा ढोल ताशा पथक सदस्य, माणुसकी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक, अलिबाग सायकल स्वार संघटना, अखिल भारतीय हिंदी सहचर सम्मेलन, न्यू इंडिया अशुरन्स कंपनी मुंबईचे प्रतिनिधी यांनी प्लास्टिक संकलन मोहिमेत सक्रिय सहभाग घेवून मोहीम यशस्वी केली.
या श्रमदान मोहिमेत रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. नितीन घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. नितीन मंडलिक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. दत्तात्रय पाथरूट, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे, अतिरिक्त लेखा अधिकारी श्री. विकास खोळपे, लेखाधिकारी श्री. प्रशांत जगताप, अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. डी. एल. साळावकर, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा कक्षाचे सर्व तज्ञ व सल्लागार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
यावेळी श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलनातून क्लिन इंडियाचा संदेश देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्र किनाऱ्यावरील अंदाजे ६०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. या प्लास्टिकचे संकलन करून ते प्लास्टिक रिसायकलिंग प्रक्रियेकरीता देण्यात येणार आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी स्वच्छतेस प्राधान्य द्यावे ! मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »