Press "Enter" to skip to content

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कामे 30 नोव्हेंबरपर्यंत गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश !

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी नागरिकांसाठी खुले व्हावे यादृष्टीने 30 नोव्हेंबरपर्यंत स्मारकाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागास दिलेले असून त्याविषयी सातत्याने बैठका घेत कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

  या अनुषंगाने आज आयुक्तांनी स्मारक स्थळाला भेट देत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व 30 नोव्हेंबरची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे निर्देश दिले. स्मारकाचे काम वेगाने करताना गुणवत्तेत अजिबात तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट करीत स्मारकातील प्रत्येक गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी अच्युत्तम गुणवत्तेची असावी याची काटेकोर काळजी घेण्याचे त्यांनी आदेशित केले. याप्रसंगी शहर अभियंता  संजय देसाई आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी व वास्तुविशारद उपस्थित होते. या कामाला 30 नोव्हेंबरची डेडलाईन असल्याने मनुष्यबळ वाढवून समांतरपणे कामे सुरू ठेवावीत तसेच कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांनी या कामाचे प्राधान्य व वेळेची मर्यादा लक्षात घेता या कामाकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावे आणि गुणवत्तापूर्ण काम करावे असे आयुक्तांनी सूचित केले.      स्मारकाच्या दर्शनी भागात असलेल्या नामफलकावरील अक्षरे मंद प्रकाशाने उजळणारी असावीत असे सूचित करीत स्मारकाच्या मागील भागातही मुख्य रस्त्यावरून नजरेस पडेल असा प्रशस्त व आकर्षक नामफलक लावण्याची सूचना त्यांनी केली. स्मारकाच्या अंतर्भागातील कामांप्रमाणेच बाह्य भागातील आर्चेस व कंपाऊंड जाळीच्या कामांकडेही बारकाईने लक्ष देत त्या कामांना वेग देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचा आलेख मांडणा-या दालनामधील छायाचित्रे उच्चतम स्वरूपात ठळकपणे  प्रदर्शित करणेविषयी त्यांनी मौलिक सूचना केल्या तसेच प्रदर्शित छायाचित्रांच्या पॅनलवर लिहिलेली माहिती त्यावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रदर्शन पाहणा-या व्यक्तीला ऐकूही येईल अशाप्रकारे करण्यात येणा-या व्यवस्थेत अद्ययावत प्रणाली वापराचे निर्देश दिले. स्मारकातील विशेष दालनात आभासी वास्तवदर्शी चित्रणाव्दारे (Augmented Reality) बाबासाहेबांचे भाषण दाखविण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना राबविताना ती सर्वोत्तम गुणवत्तेची असावी याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.स्मारकात असणा-या ग्रंथालयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिलेली विविध ग्रंथसंपदा असावीच याशिवाय ज्ञानसूर्य असे संबोधल्या जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदाही याठिकाणी उपलब्ध करून हे ग्रंथांलय परिपूर्ण असावे यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पुस्तक स्वरूपातील ग्रंथसंपदेप्रमाणेच ई बुक व ऑडिओ बुक सुविधाही या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश याप्रसंगी आयुक्तांनी दिले.

  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय असून त्यादृष्टीने स्मारकामधील प्रत्येक काम गुणवत्ता राखून 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. 
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »