Press "Enter" to skip to content

विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कठोर कारवाई

कोरानाच्या ओमायक्राॅन उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी कोरानाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

– श्री.गणेश देशमुख,आयुक्त पनवेल महानगरपालिका

पनवेल : राज्यभर ओमायक्राॅन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’ चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे.

महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, माॅल्स, गर्दीची ठिकाणे येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना ५००रूपये दंड आकारण्यात येत आहे.

तसेच प्रत्येक विभागात , मॅरेज हाॅल्स, बॅंकेट हाॅल, सोसायट्या यांच्यावरही पालिकचे लक्ष असणार आहे. ३१डिसेंबरला नव वर्षानिमित्त कोणतेही कार्यक्रम करण्याआधी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक दिसून आल्यास अशा आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले आहे.तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ट्रॅव्हल पास असणे बंधनकारक असणार आहे.

पालिका क्षेत्रातील सर्व हाॅटेल्समध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच त्या हाॅटेलमध्ये प्रत्यक्षात किती जागा आहेत व त्यांच्या ५० टक्के किती जागा भराव्यात, हाॅटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असावे, मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.रात्रीची जमावबंदी पालिकेने घोषित केली असल्याने रात्री ९:०० ते सकाळी ६:००वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत अशा सुचनांचे स्टिकर्स हाॅटेल्सच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत.या सुचनांचे उल्लंघन हाॅटेल धारकांनी केल्यास अशा हाॅटेल्सवर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पालिका क्षेत्रात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून साडे तेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »