Press "Enter" to skip to content

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर ! राष्ट्रवादी खारघर महिला काँग्रेसने जल्लोषात केले कायद्याचं स्वागत !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास होणार फासीची शिक्षा;
सोशलमिडीयावर चुकिची कमेंटदेखील पडू शकते भारी !

पनवेल : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी (गुरुवार दि 23 डिसेंबर) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी खारघर शहराच्या वतीने सदर कायद्याचं जल्लोषात स्वागत केले. खारघर शहरात पेढे वाटून आनंद साजरा केला. विरोधकांकडूनही या कायद्याचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

राज्यात अ‍ॅसीड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतचा ‘शक्ति कायदा’ राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली होती. महिला व बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींवर कार्यवाही करता यावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर शक्ति कायदा करण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यानुसार शक्ति फौजदारी कायदा( महाराष्ट्र सुधारणा) विधेयक गेल्या वर्षी अर्थसंल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात आले होते. या कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अ‍ॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत. तर सारे खटले एका महिन्यात निकाली काढणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालये स्थापन करणे या गोष्टींचा समावेश आहे. विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडलं जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

नवीन कायद्यात अशा आहेत तरतुदी……
– ‘शक्ती’ कायद्यानुसार, महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या प्रकरणात 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
 – बालत्काराच्या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आरोपीला जामीनावर तुरुंगामधून बाहेर येत येणार नाही. अनेकदा अशाप्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर आरोपीकडून पीडितेवर हल्ला केला जाण्याची शक्यता असते. ती या कायद्यामुळे संपुष्टात येणार आहे.
– महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तर कठोर शिक्षाचे तरतुद कायद्यात आहे. तसेच जर चुकीच्या पद्धतीची कमेंट करण्यात आली तरीही त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे.
– मेसेज अथवा डिजीटल माध्यमातून छळ केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंडाचाही समावेश आहे.
– बालात्काराच्या दुर्मिळ प्रकरणात तातडीने खटला चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरदूत कायद्यात आहे. या कायद्यामध्ये बलात्काराच्या प्रकरणांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. या वर्गीकरणानुसार जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाखांपर्यंतचा दंड अशीही तरतुद करण्यात आली आहे.
 – 16 वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार झाल्यास दोषीला मरेपर्यंत जन्मठेप आणि मृत्यूदंडाच्या शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खारघर महिला आघाडीच्या वतीने खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांच्या नेतृत्वाखाली खारघर सेक्टर १२ येथील चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करीत पेढे वाटप करून कायद्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी संगीता सुर्वे ,सुनंदा कुंभार ,सुनिता पेटकर,विजया मोहीते, महानंदा बाबरे, कमल मॅडम ,माधवी ओंबळे सारिका शिरसागर ,युवती रेनु पगारे वैशाली मॅडम ,सुनिता साबळे तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »