Press "Enter" to skip to content

शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित, करोनाने मृत्यू झाला असल्यास मिळणार 50 हजारांची सानुग्रह मदत ! संबंधितांनी अर्ज करण्याचे आयुक्त गणेश देशमुख यांचे आवाहन !

पनवेल :कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यपरथापन मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. या निर्देशानूसार करोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांनी किंवा निकटच्या नातेवाईकांनी सानुग्रह मदत मिळण्याबाबत राज्य सरकारने कार्यान्वित केलेल्या ऑनलाइन वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.

 या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार सानुग्रह सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने www.mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक राहील. याकरिता अर्जदार स्वतः किंवा सेतु केंद्रामधून किंवा ग्रामपंचायतीमधून सीएससी- एसपीव्ही मधून अर्ज करु शकेल.
 हा अर्ज दाखल करताना अर्जदारास खालील कागदपत्रेमाहिती सादर करणे बंधनकारक राहील.

 1. अर्जदाराची आधार कार्ड प्रत, 2. मृत व्यक्तींची आधार कार्डची प्रत, 3. जन्म आणि मृत्यु नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत मृत व्यक्तींचे मृत्यु प्रमाणपत्र, 4. अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक, 5. अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत, 6. मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, 7. आरटीपीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर वैद्यकीय कागदपत्रे, (जेव्हा कागदपत्र क्र. ६ उपलब्ध नाही) 8. इतर निकट नातेवाईकांचे ना-हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र.

 या कागदपत्रांच्या आधारे अर्जदारास स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळण्यासाठी लॉग-इन करता येईल. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदाराने शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक 2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर 2021 अन्वये जिल्हास्तरावरील तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीचे सचिव डॉ.आनंद गोसावी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करावेत.

 या तक्रार निवारण समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय सानुग्रह सहाय्यासाठी मंजुर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरीता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरीता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.