Press "Enter" to skip to content

अर्थसंकल्पातून देश व राज्याचा सक्षम विकासाचा वेग – आमदार प्रशांत ठाकूर !

अर्थसंकल्पातून देश व राज्याचा सक्षम विकासाचा वेग – आमदार प्रशांत ठाकूर ! डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेचे अर्थसंकल्प – प्रतीक कर्पे

पनवेल(प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने हे जनतेचे अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी आज (दि. १२) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वाने सर्वसामान्यांना प्रगतीभिमुख वाटेवर नेण्याचे काम अधिक जोमाने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  प्रतिक कर्पे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले कि, अर्थसंकल्पात शेवटच्या व्यक्तीचा विचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरल्या आहेत. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशी आहे. ‘पंचामृता’च्या माध्यमातून मांडण्यात आलेला अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकाचा प्राधान्याने विचार केल्याचे दिसते. राज्याची अर्थव्यवस्था अधिक व्यापक करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिल्याचे ठळकपणे जाणवते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी देण्यात आले आहेत.मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारली जाणार आहेत. तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येणार असून शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.शेतकऱ्यांचा सन्मान होण्यासाठी या अर्थसंकल्पातकृषी क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आता केवळ १ रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. याचबरोबर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाणार आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ  दिले जातील. २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ दिले जातील. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महाकृषिविकास अभियान तसेच कोकणासाठी काजू बोर्ड बनवले जाणार आहे. याबरोबरच नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले गेले आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी १ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाईल. शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना उपयुक्त ठरेल. एकूणच शेतकऱ्यांना थेट रोखीने आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात आला आहे. ‘बोलण्यावर नाही, कृतीवर भर’ मुंबईचा सर्वांगिण विकास या न्यायानेमुंबईच्या सुशोभिकरणासाठी १ हजार ७२९ कोटी रुपये तरतूद केली आहे. एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण केले जातील. ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण केल्या जाणार आहेत. पुणे मेट्रोसाठी ८ हजार ३१३ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. तर मुंबईत ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल. मुंबई मेट्रो १०, ११,१२ असे नवीन प्रकल्प उभारले जातील. यातून सर्वसामान्य मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणवर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात येत आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळेल.जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तसेच पहिलीत ४, सहावीत ६, अकरावीत ८ आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये अशी तरतूद केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली.महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना होईल. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जातील.आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ केली गेली आहे.नोकरदार महिलांसाठी ५० वसतीगृहे आणिअडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना आणण्यात आली आहे.

कर्पे यांनी पुढे सांगितले कि, आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या आरोग्यावर खर्चासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये केले आहे. त्यामुळे आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश होईल. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५०लाखांहून ४ लाखांपर्यंत केले जाईल. तसेच राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्पात रस्ते प्रकल्पाच्या आधुनिकतेवर भर दिला गेला आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक,विरार-अलिबाग मार्ग, रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी देण्यात आला आहे.हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून ७ हजार ५०० कि.मी.चे रस्ते त्यासाठी ९० हजार कोटी रुपये तरआशियाई बँक प्रकल्पातून ४६८ कि.मी.चे रस्ते उभारले जातील. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ६५ हजार कि.मी.चे रस्ते तयार केले जाणार आहेत. रेल्वे प्रकल्प, बसस्थानक आधुनिकीकरण आणि विमानतळ विकास करण्यावर भर देताना नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी दिला आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेजसाठी ४५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. १०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटीचा निधी दिला जाणार आहे. शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारले जाणार असून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारही केला जाणार आहे. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत आहे. रोजगारासाठी गावा गावातून होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आता रोजगार आणि स्वयंरोजगाराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमधून कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. तसेच कौशल्य वर्धानाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी पुढील तीन वर्षात २ हजार ३०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५०० औद्योगिक संस्थांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे. तसेच ७५ संस्थांचे आधुनिकीकरण करून त्याद्वारे युवकांना रोजगाराचे धडे देण्यात येणार आहेत. या योजनांसाठी ६१० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी विकासाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थांना आता भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिक्षणसेवकांच्या माधनात मोठी वाढ केली आहे. शैक्षणिक संस्थासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तर खेळांना प्रोत्साहनासाठी विविध योजना मांडल्या आहेत. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार आहे. पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ होणार आहे.

भाषा अन संस्कृतीसाठी मोठी घोषणा यात करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ करण्याची घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी केली. यासह अनेक ठिकाणी नाट्यगृह, चित्रनगरींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये, दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी रुपयांची तरतूद आहे. कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरीबरीने पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ५०० युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाईल.पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे.१० पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार आहे. राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार असून यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब दिसते. या अर्थसंकल्पातील सर्वच बाबी ‘सर्वजनहिताय’ अधोरेखित करणार्‍या आहेत,’ एकूणच राज्याचा हा नुसता अर्थसंकल्प नाही, तर महाअर्थसंकल्प ठरणारा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठलेही आकडे न फुगवता मागील वर्षाची तरतूद ५ लाख २८ हजार कोटी असताना एवढ्या मिशन स्वरूपात योजना ५ लाख ४७ हजार ४५० कोटीत बसवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या तळागाळातील अनुभवाची एक प्रचिती या अर्थसंकल्पातून दिली आहे, असेही प्रतीक कर्पे यांनी यावेळी नमूद केले.

कोट-

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ सालापासून देशात विकासाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे राजकारणाची परिभाषा बदलून देश प्रगतशील होत आहे. सबका साथ सबका विकास हे सूत्र कायम ठेवून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी काम केले जात आहे, त्या अनुषंगाने केंद्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या
तर राज्यात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत देशाच्या आणि राज्याच्या सक्षम विकासाचा वेग मांडला आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या विकासाचा पंचामृत असा आहे. -अध्यक्ष- रायगड जिल्हा भाजप, आमदार प्रशांत ठाकूर