Press "Enter" to skip to content

नागरिकांना प्रथम सांगा, मग हरकती सूचना मागा ! दशरथ भगत यांचे नवी मुंबई बचाओ आंदोलन !

नागरिकांना प्रथम सांगा, मग हरकती सूचना मागा ! नवी मुंबई बचाओ आंदोलन !

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रारूप विकास आराखड्या बाबत नागरिकांना प्रथम सांगा, त्यांच्याकडून हरकती आणि सूचना मागा असा जागर करीत घटस्थापनेपासून सुरु करण्यात आलेल्या जागर जनजागृतीच्या अभियानानंतर आज नवी मुंबई बचाओ या शिर्षकाखाली माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी नवी मुंबईतील नागरिक व पुढील पिढी वर्तमान व भविष्यातील नागरी सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते.

यावेळी उपोषण स्थळी लोकनेते आमदार गणेशजी नाईक, माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, संपत शेवाळे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राजेश शिंदे, मा. परिवहन समिती सदस्य राजेंद्र इंगळे, विजय वाळुंज, निसर्ग प्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र नेते दिपक पाटील, मा. नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत,रूपाली भगत यांसह रिक्षा व टॅक्सी महासंघ नवी मुंबई चे विजय पाटील, मारुती कोंडे, सोनखार जेष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य, वाशी सेक्टर १५-१६ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे जेष्ठ नागरिक, माथाडी कामगार वसाहती नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक आणि नवी मुंबई MIDC क्षेत्रातील झोपडपट्टी भागातील रहिवासी समर्थनार्थ उपस्थित होते. 

*लोकनेते आमदार गणेशजी नाईक यांनी यावेळी उपोषणाला सरकार पक्षाचे आमदार म्हणून पाठिंबा देताना मार्गदर्शन असे म्हटले की,  नवी मुंबई शहराचा प्रारूप आराखडा जो पालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे व त्या विरोधात दशरथ भगत यांनी जे अभियान राबवले ते कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षात प्रशासन बापाशिवाय चालले होते. सगळा सावळा गोंधळ व भ्रष्टाचार चालला होता. सिडकोत व पालिकेतही कोरोना काळात काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनात बोलणार असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार आहोत. सिडकोच्या मनमानी कारभाराबाबत व भूखंड विक्रीबाबत मी तत्कालीन नगरविकास मंत्री जे आज मुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन देवून भूखंड विक्री थांबवावी याचे निवेदन दिले होते. मात्र मंत्र्यांचे आदेश डावलून सिडकोने मनमानी केली याबाबत मी पुन्हा मा. मुख्यमंत्र्यांना व मा. उपमुख्यमंत्री महोदयांना अवगत करणार आहे. एमआयडीसी तील सर्व्हिस रोडवर काही हॉटेल्स आहेत. त्यांच्या पार्किंगमुळे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने एका पादचाऱ्याला चिरडले. याबाबत तत्कालीन पालिका आयुक्त बांगर यांना निवेदन देवून सर्व्हिस रोडवरील सर्व हॉटेल्सना बंद करून त्यांना अन्यठिकाणी जागा उपलब्ध करून सर्व्हिस रोड मोकळा करावा असे आदेश  एका आठवड्यात  काढावे अन्यथा मी आयुक्त दालनात जमिनीवर बसेन असा इशारा दिला आहेच, पण त्यांची बदली झाल्याने नवीन आयुक्तांना भेटून पुन्हा यासंदर्भात चर्चा करणार आहे. डीपी प्लान बद्दल काही मागण्या मान्य होऊन त्यांची अंमलबजावणी सुरु झाली असून उर्वरित जबाबदारी पालिका पूर्ण करील अशी आशा आहे.*

*जागर जनजागृतीचा या नऊ दिवस बेलापूर ते ऐरोली दरम्यान विविध नोड्स मध्ये करण्यात अनोख्या जनआंदोलनाची दखल नवी मुंबई मनपाने घेऊन हरकती व सुचनासाठी मुदतवाढ तत्वतः दिली होती मात्र अद्याप अंमलबजावणी केलेली नाही, संकेतस्थळावर मराठी भाषेत अहवाल प्रसिद्ध केलेला आहे परंतु अद्यापही नकाशे आणि टाकलेले आरक्षण याबाबत प्रभाग (वार्ड) स्तरीय व्यापक जनजागृती व शिबिरे घ्यावीत या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. नऊ दिवस घेण्यात आलेल्या अभियानात नागरिकांनी जमा केलेल्या एकूण 12000 (बारा हजार) सूचना व हरकती या प्राप्त झाल्या असून उद्या सकाळी ११.३० वाजता मा. महापालिका आयुक्तांना पालिका मुख्यालयात देण्यात येणार आहेत.* उपोषण स्थळी नागरिकांनी जागर जनजागृतीचा या अभियाना अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत नोंदविलेल्या जमा हरकती सूचना पत्रांची व दशरथ भगत यांची तुला वाशी, छत्रपती शिवाजी महाराज  चौकात करण्यात आली. भगत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त हारतुरे व पुष्पगुच्छ न आणता हरकती सूचना आणाव्यात असे आवाहन केले होते, त्यानुसार ही तुला नागरिकांच्या सूचनेनुसार करण्यात आली, यावेळी माजी खासदार डॉ संजीव नाईक उपस्थित होते.

उपोषण ठिकाणी व्यासपीठावर श्री भगत यांनी भेट घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या वतीने महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तथा नगररचनाकार श्री सोमनाथ केकाण यांनी निवेदन स्वीकारले.

नवी मुंबई मनपाने तब्बल २५  वर्षानंतर  प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. मात्र हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलाच नाही, तो पोहचावा याचे काहीच नियोजन नाही परिणामी विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी समजून घेणे सहज शक्य नसल्याने नवी मुंबईकर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे याचा बोध महापालिकेने घ्यावा असेही उपोषणकर्ते दशरथ भगत यांनी आर्त जनभावना उपोषण स्थळी व्यक्त केली.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »