श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सज्जता
श्री गणेशोत्सवाला 31 ऑगस्ट 2022 पासून उत्साहात सुरुवात होत असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.
श्रीगणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप परवानगी मिळणेकरिता कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता ई-सेवा ऑनलाईन संगणक प्रणाली दोन महिने आधी 14 जुलै पासूनच सुरू करण्यात आली असून महानगरपालिका, पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व विभागांच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या एकाच अर्जाव्दारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील 164 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन मंडप परवानगी घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क महानगरपालिकेने आकारलेले नाही.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये नवी मुंबई हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून नागरिकांनी श्रीगणेशमूर्ती आणताना सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती श्रीगणेशमूर्तीं 2 फूट उंचीच्या मर्यादेत ठेवण्याबाबत आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्यामार्फत सुरुवातीलाच आवाहन करण्यात आले होते. तसेच श्रीमूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूच्या असाव्यात असेही सूचित करण्यात आले होते.
याशिवाय श्रीमूर्तींचे विसर्जन करताना ते घरच्या घरी करावे अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जन तलावाठिकाणी करावे असेही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये एकूण 134 कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्यात आली असून नागरिकांनी नैसर्गिक जलाशयांचे रक्षण करण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावांमध्येच श्रीमूर्ती विसर्जन करावे असे सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा वापर टाळावा असे आवाहन करतानाच पीओपीची मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात 16, नेरुळ विभागात 25, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 20, कोपरखैरणे विभागात 14, घणसोली विभागात 18, ऐरोली विभागात 16 व दिघा विभागात 9 अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्याप्रमाणेच 22 पारंपारिक नैसर्गिक विसर्जन स्थळांठिकाणची साफसफाई व त्या परिसरात आवश्यक दुरूस्ती कामे करण्यात आलेली आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात 5, नेरूळ विभागात 2, वाशी विभागात 2, तुर्भे विभागात 3, कोपरखैरणे विभागात 2, घणसोली विभागात 4, ऐरोली विभागात 3, दिघा विभागात 1 अशा एकूण 22 पारंपारिक नैसर्गिक विसर्जनस्थळांवर श्रीमुर्तींच्या विसर्जनकरीता तराफ्यांची तसेच आकाराने मोठ्या मुर्ती विसर्जित होणा–या तलावांठिकाणी क्रेन अथवा ट्रॉलीची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले आहे.
‘तलाव व्हिजन’ अंतर्गत मुख्य 14 तलावांमध्ये इटालियन प्रकारच्या गॅबियन वॉल रचनेव्दारे श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र असून भाविकांनी व श्रीगणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याच क्षेत्रात श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी आपले अमूल्य योगदान दयावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या याही वर्षी करण्यात येत आहे.
प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेश्या विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था तसेच प्रथमोपचार कक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून सुविधा मंच उभारण्यात येत आहेत. त्याठिकाणी श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याकरीता करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे. श्रीमूर्ती विसर्जनासाठी 22 विसर्जनस्थळांवर 700 हून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यासोबतच त्याठिकाणी अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् तैनात असणार आहेत. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सर्व व्यवस्था व स्वयंसेवक सज्ज असणार आहेत.
नैसर्गिक व कृत्रिम अशा एकूण 156 विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रसाद साहित्य व फळे गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे याची नोंद घेत भाविकांनी आपल्याकडील अधिकची फळे व प्रसाद साहित्य विसर्जनस्थळांवरील या विशिष्ट ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जन स्थळांवर दररोज जमा होणा-या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीगणेशोत्सव 2022 च्या सुनियोजित आयोजनासाठी नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून भाविक भक्तजनांनीही श्रीगणेशोत्सव इकोफ्रेंडली निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने सर्व नागरिकांना श्रीगणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहेत.





