Press "Enter" to skip to content

निवडणूका जिंकण्यास सज्ज व्हा : चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ! # हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

पनवेल, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले. 

            भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, चंद्रशेखर बावनकुळे, 

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आ. आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संजय कुटे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते. 

          चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाने राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदु्त्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत मा. एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या बैठकीच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष प्रयत्न घेणारे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी आवर्जून केले. 

       सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय परिवर्तनामुळे केंद्र सरकारच्याच विचारांचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परीश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. 

        शिवप्रकाशजी म्हणाले की, जनादेशचा सन्मान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सामान्यांची सुरक्षितता आणि हिंदुत्व यासाठी भाजपा शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाला जनमत अनुकूल आहे. संघटनात्मक बांधणीत आता मोठी झेप घ्यायची आहे. प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला. तर भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. 

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

“हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने विकासाला प्राधान्य देण्याऐवजी सूडबुद्धीचा कारभार सुरू केला. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक केली गेली. या परिस्थितीतही कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडी सरकारने वारंवार हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा आणि दाऊदच्या विचारांचा बचाव करायचा असे प्रकार सहन न झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने जनतेने आता मोकळा श्वास घेतला आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे.आम्ही कोणाचेही लांगुलचालन करणार नाही, सर्वांना समान न्याय देऊ.
भाजपा नेतृत्वाने कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता.फक्त सत्तेसाठी त्यांनी जनादेशाचा अपमान केला. कारण काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर जायचे त्यांनी आधीच ठरवले होते .
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत.हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मी सरकारबाहेर राहून पक्षाचे कार्य करण्याचे ठरवले होते.परंतु पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला.मी तो पाळला.पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणे हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.
श्री.फडणवीस म्हणाले की, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. आम्ही तातडीने आवश्यक कार्यवाही करून हे आरक्षण परत मिळवले.मराठा आरक्षण विषयही आम्ही मार्गी लावू. विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू.

नव्या सरकारने सत्तेत आल्या आल्या अनेक निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेल स्वस्त केले.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामांतर केले, नवी मुंबई विमानतळाला दि .बा. पाटील यांचे नाव दिले, स्वच्छ महाराष्ट्र अभियान साठी १२ हजार कोटींची तरतूद केली, गणेशोत्सव, दहीहंडी वरील निर्बंध उठवले, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निविदा काढली गेली, आरे कारशेड वरील बंदी उठवली, वारकऱ्यांना टोल माफी दिली, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

चौकट- 

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. उत्कृष्ट आयोजन व यशस्वी नियोजन या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. पनवेल व आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण वातावरण भाजपमय पहायला मिळाले. बैठकीसाठी आलेल्या सर्व मान्यवर तसेच प्रतिनिधींचे स्वागत ते समारोप, निवास, पार्किंग, भोजन अशी सर्व  व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी नियोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. माजी मंत्री व विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »