पनवेल : पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 50 हजाराचे अर्थसहाय्य वाटप करण्याचा कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त श्री. गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपमहापौर सीताताई पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, महिला बालकल्याण समितीच्या सदस्या, प्रभाग समिती सभापती व नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाला.
कोरोना काळात अनेक बालकांच्या पालकांचे आकस्मात मृत्यू झाले. वय वर्षे 21 वर्षाखालील जी मुले अनाथ झाली अशा अविवाहित मुलांमुलींना आर्थिक मदत देऊन त्यांच्या दु:खाचा भार हलका करावा या उद्देशाने महापालिकेने महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर यांच्या काळात हा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता.
त्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आज एकुण 128 बालकांना मुदत ठेवीच्या स्वरूपात अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना त्याच्या वेळेच्या उपलब्धीनुसार मदतीचे धनादेश देण्यात येणार आहेत. कोरोना काळात ज्या बालकांचे एक किंवा दोन पालक गमावले त्यांना महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने भरीव रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापौरांनीही त्यांच्या मनोगतामध्ये महापालिका उपस्थित सर्वांच्या दु:खामध्ये सामिल असून त्यांचे दु:ख हलके करण्याच्या दृष्टीने ही मदत केली असल्याचे सांगितले.
यावेळी आयुक्त श्री. गणेश देशमुख म्हणाले, ही मदत बालकांच्या भविष्यासाठी केलेली एक तरतूद आहे. महिला बालकल्याण समितीने कोरेाना काळात पालक गमावलेल्यांना आर्थिक मदत देण्याची संकल्पना मांडली. या मदतीच्या रूपातून महापालिका या बालकांना नवी उमेद देत असल्याचे सांगितले.
महापालिका क्षेत्रातील अजूनही कोरोना काळात एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत मिळाली नाही त्यांनी पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांनी केले आहे.
यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एक किंवा दोन पालक गमावलेले मुले-मुली, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने कोरोनाकाळात पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




