पनवेल, प्रतिनिधी : येत्या २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी करत ‘भूतो न भविष्यतो’ आंदोलनाचा गर्भित इशारा काळा दिन आंदोलनातून सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला, आणि तशी घोषणा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी यावेळी केली. तसेच यावेळी रखरखत्या उन्हात सिडकोच्या नावाने शिमगा करण्यात आला. येत्या काळात सिडको आणि राज्य सरकारच्या उरात धडकी भरवणारे निर्णय घेण्यात येतील असे या आंदोलनातून अधोरेखित करण्यात आले.
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, सरचिटणीस कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, राजेश गायकर, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते सुरेश पाटील, अरुण जगे, महापालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेविका हेमलता म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अमर पाटील, प्रवीण पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण उपसरपंच विजय घरत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कमगारनेते सुधीर घरत, सुनील घरत, यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून १७ मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील ९५ गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व इतर प्रकल्प समितीच्यावतीने दास्तान फाटा येथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या क्रांतिभूमीतून दिबांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच २४ जूनचा एल्गार जाहीर करतानाच आजपासून त्याची तयारी आणि नियोजन सुरु असल्याचे अधोरेखित केले.
१८ एप्रिल २०२१ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा बाबत सिडको संचालक मंडळाने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करण्यात यावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनविलंब १२.५% भूखंड वाटप करण्यात यावे, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबाबत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन योग्य ते बदल करण्यात यावेत तसेच नवीमुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या बैठका घेऊन सोडविण्यात याव्यात, या मागण्यांसाठी गुरुवारी जोरदार रास्ता रोको करण्यात आला. आंदोलन तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, कॉम्रेड भूषण पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, दशरथ भगत तसेच महिला आंदोलकांना ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सिडको व राज्य सरकारच्या विरोधात २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from ThaneMore posts in Thane »