Press "Enter" to skip to content

नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू राहणार !

नवी मुंबई / पनवेल : राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग दिनांक 04/10/2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच दिनांक 29 नोव्हेंबर 2021 च्या शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी चे वर्ग दिनांक 01/12/2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
मात्र, तथापि, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गांसाठीच्या (इयत्ता पहिली ते नववी व अकरावी) सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक 04/01/2022 ते 30/01/2022 पर्यंत अध्यापनासाठी प्रत्यक्ष बंद ठेवणे व सदर वर्गांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने नियमित सुरू ठेवणे तसेच इयत्ता दहावी व बारावी चे वर्ग यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरू ठेवण्याचे आदेश शाळांना दिलेले आहेत.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी देखील पनवेल मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्गातील शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरु राहणार आहेत. नवीन आदेश येईपर्यंत शाळा बंद करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलाविता येईल आणि सदर वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेले आहेत.