भविष्यातील अपघात टळला -अमर उपाध्याय !
नवी मुंबई : खारघर सेक्टर 12 मधील उघडे डीपी आणि पदपथावर असलेले उघडे केबल तात्काळ बंदिस्त करण्याच्या स्थानिक नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या मागणीला यश आले आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बुधवारी उघडे डीपी आणि केबल बंदिस्त केले. यामुळे खारघरमध्ये भविष्यात होणारे अपघात टळले, अशी प्रतिक्रिया युवानेते अमर उपाध्याय यांनी व्यक्त केली.
खारघर प्रभाग क्रमांक 5 मधील सेक्टर 12 परिसरात वीज कंपनीचे अनेक डीपी आणि केबल उघडे पडले आहेत. लॉकडॉऊन काळात वीज कंपनीने वीज बिल माफ केले नाही. उलटपक्षी, भरमसाठ वीज बिल वसूल केले. मात्र, रस्त्यावरच्या उघड्या डीपी आणि केबल बंदिस्त करण्याकडे वीज कंपनी दुर्लक्ष करीत होती. सदर उघड्या डीपी व केबलमुळे पदपथ व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना शॉक लागून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी वीज कंपनीकडे पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावला. बुधवारी खारघर येथील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली. वीज कंपनीने तात्काळ कार्यवाही करून उघड्या डीपी व केबल बंदिस्त केल्या.





