Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य चळवळीच्या सूचितून ‘शेकाफे’ला वगळले ! डॉ डोंगरगावकर यांचा गौप्यस्फोट !

पनवेल : हैदराबाद मुक्ती संग्रामात आर्य समाजासारख्या अनेक संघटनाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचाही सहभाग हा लक्षणीय आणि अविभाज्य होता. असे असतानाही तत्कालीन इतिहासाच्या सरकारी सूचित आर्य समाजाचा उल्लेख असला तरी शेकाफेला त्यातून वगळण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी आज येथे केला.त्या सूचित शेकाफेचाही समावेश करून केंद्र आणि राज्य सरकारने चुकीची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नवी मुंबईतील सत्याग्रह महाविद्यालयात आज हैद्रबाद (मराठवाडा) मुक्तिसंग्राम दिनाचा समारंभ पार पडला. त्यात ते मार्गर्शन करताना बोलत होते. मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथे शाहिद स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देतानाच मराठवाड्यासाठी अनेक विकास योजना जाहीर केल्या. त्याचे या समारंभात सर्वच मान्यवर वक्त्यांनी स्वागत केले.

डॉ डोंगरगावकर पुढे म्हणाले की, आमची राहुल शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था हैद्रबाद (मराठवाडा) मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केली आहे. भाऊसाहेब मोरे हे शेडूल्ड कास्ट फेडेरेशनचे स्टेट ऑफ हैद्रबादच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष होते. त्यांचे सहकारी रामराव हरिराव गुरुजी (बिदर), हरिहरराव सोनुले, व्ही. एल. सूर्यवंशी, दशरथ सोनकांबळे, विठ्ठल जोंधळे, कोंडीबा डोंगरगावकर यानी हैद्रबाद (मराठवाडा) मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. त्यांच्यासह शेकडो शेडूल्ड कास्ट फेडेरेशनचे कार्यकर्ते या लढ्यात सहभागी होते. त्यांना शासनाकडून स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळत आहे.

आर्य समाज या संघटनेचा समावेश स्वातंत्र्य चळवळीच्या यादीत केला आहे. पण शेडूल्ड कास्ट फेडेरेशनचा समावेश या सूचित नाही.हा प्रकार आंबेडकरी समाजाचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान नाकारणारा आणि इतिहासाशी प्रतारणा करणारा आहे, असे डॉ डोंगरगावकर यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त या परिसंवादात हर्षल शाक्य, सुजाता भोसले, गोविंद बनसोडे, पत्रकार तानाजी जगताप, यांनीही आपले विचार मांडत निजामकालीन इतिहासाला उजाळा दिला.

१८६१ पासून विदर्भ, १८१८ पासून पश्चिम महाराष्ट्र,कोकण, खान्देश ब्रिटिश राजवटीच्या अमलाखाली होता. त्यामुळे उच्चशिक्षण, औद्योगिकरण आणि काही अंशाने सामाजिक कायदे या प्रांतात झाले. महात्मा जोतिबा फुले, छ. शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, या प्रदेशात समाज सुधारणेची कामे केली. अश्या संधीपासून हैदराबाद संस्थानातील जनता वंचित होती. १७७४ ते १९४८ या काळात निजामाचा जुलमी मारा या प्रांतावर होता. निजाम मुस्लिम धर्मप्रसारक होता. या प्रदेशातील अस्पृश्यानी निजामाची जुलूमशाही पत्करली पण धर्मांतर करून ते मुस्लिम धर्मात गेले नाहीत. अशा या समाज समूहावर जातीय अन्याय अत्याचार निजामी वृत्तीच्या येथील लोकांकडून होतो हाच या प्रदेशाच्या विकासातील मोठा अडसर आहे, असा सूर परिसंवादातील वक्त्यांनी यावेळी काढला.

प्रबोधनकार, भय्यासाहेबांना अभिवादन

समारंभाच्या प्रारंभी समाजसुधारक ई. पेरियर रामास्वामी नायकर, पूज्य अनागरिक धम्मपाल, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती आणि सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

डॉ मगरे, प्राचार्य शिवारे यांना पुरस्कार

संस्थेचे संस्थापक सल्लागार स्वतंत्र सेनानी रामराव हरिराव गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “स्वतंत्र सेनानी रामराव हरिराव गुरुजी आदर्श शिक्षक २०२१” पुरस्कार प्रोफेसर डॉ. व्ही.एम. मगरे, (माजी उपकुलगुरू, मुंबई विद्यापीठ) आणि प्राचार्य डॉ. टी.एस. शिवारे (अध्यक्ष अखिल भारतीय वाणिज्य परिषद) यांना जाहीर करण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनी सन्मानचिन्ह आणि पंच्याहत्तर हजार रुपये रोख देऊन सन्मान पत्र देण्यात येणार आहे असे प्रा. नेहा राणे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाला नेल्सन मंडेला आश्रमशाळा, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल,आणि सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »