पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर नोड मधील रहिवाशी क्षेत्रातील रस्त्यांवर भारत गॅस सिलेंडरचे ट्रक बेकायदा उभे केले जात असून येथे मोठी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी खारघरवासियांनी केली आहे.
पनवेल पालिकेतील प्रभाग क्र.४ खारघरच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्याकडे प्रभागातील खारघर सेक्टर १९ येथील रहिवाश्यांनी याबाबत अनेकदा तक्रार केली आहे. भारत गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक हे प्लॉट न.५५, तुलसी विहार सोसायटी जवळ पार्क केलेल्या असतात.नागरी वस्ती मध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरच्या गाड्या (ट्रक) दिवसरात्र उभ्या केलेल्या असतात. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी ट्रक मधून छोटया टेम्पोत भरलेल्या गॅस सिलिंडरची चढ-उतार देखील केली जाते. सदर एजन्सीही ज्वालाग्रही वस्तूच्या साठवण व वितरण नियमांचे उल्लघन करत असल्याचे प्रथम दर्शी दिसून येते. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे व ते आपला जीव धोक्यात घालून राहात आहेत. रहिवाश्यांनी वेळोवेळी सदर गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला देखील सदर बाबतीत कल्पना दिली आहे.मात्र गॅसने भरलेले सिलिंडरचे ट्रक त्याचठिकाणी पार्क करतात. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. ही जागा काही ट्रक अथवा अवजड वाहन पार्किंगची नाही. अश्या अनधिकृत पार्किंगमुळे रहिवाशामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक,खारघर तसेच पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा खारघर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण दर्पण





