Press "Enter" to skip to content

काम अर्धवट असताना तळोजा भुयारीमार्ग सुरु करण्याचा घाट कशासाठी ? तळोजावासीयांचा सवाल !

सनी जाधव, पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : काम अर्धवट असताना तळोजा भुयारीमार्ग घाईघाईने सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाने आखलेला डाव अखेर फसला. भाजपने गुरुवारी भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दणक्याने तळोजा भुयारी रेल्वेमार्ग सुरु केला खरा, मात्र तासाभरातच सदर मार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला.
तळोजा फेज १ आणि खारघर शहराला जोडण्यासाठी तळोजा रेल्वे भुयारी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरु आहे. सदर काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने कमला भयंकर विलंब झाला आहे. मात्र, अद्यापि येथील काम पूर्णतः झालेले नाही. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. आज देखील पूर्वीपासून सुरु असलेल्या रेल्वे रुळावरून असलेल्या रस्त्याने जावे लागते. मात्र, येथे वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्याने येथे वाहतुकीची समस्या कायम असते. दररोज वाहतुकीची कोंडी होत असताना देखील रेल्वे प्रशासनाला जाग येत नसल्याने पनवेलचे आमदार  प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट तळोजा रेल्वे भुयारी मार्गावर धडक देत रेल्वेप्रशासनाला जाब विचारला. रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भुयारी मार्गाची एक लेन सुरु केली. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असताना तळोजा रेल्वे भुयारी मार्ग सुरु करण्याचा घाट का घातला ? हि घाई कोणासाठी ? रेल्वे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात काय ? असे अनेक प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केले आहेत .
तळोजा भुयारी मार्गात दिव्यांची सोय नाही. पावसाळ्यात पाणी साठले तर पाणी काढण्यासाठी पंप  लावलेला नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित नियोजन नाही, अशा अनेक त्रुटी असताना रेल्वे अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, तळोजा भुयारी मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, तळोजा भुयारी मार्गातील तांत्रिक अडचणी , त्रुटी पूर्ण करून साधारणतः २२ नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रेल्वेचे अधिकारी श्री मिश्रा यांनी सांगितले.

रेल्वे तळोजा भुयारी मार्गाचे काम अर्धवट काम झाले असताना त्याची सुरक्षा तपासण्याआधी तो मार्ग घाईघाईने वाहतुकीसाठी खुला करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्याचा धोका वाढविणे सारखे आहे.

– सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगेपाटील.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »