Press "Enter" to skip to content

नवी मुंबईतील जलवाहतूक पाच महिन्यात सुरू होणार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नेरूळ जेटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई आणि मांडवा ही पहिल्या टप्प्यातील जलवाहतूक सुरू होणार आहे. कोरोना महामारी मुळे या कामांची गती मंदावली होती, मात्र आता पुन्हा काम वेगात सुरू झाले आहे.

मुंबई आणि नवी मुंबई जलमार्गाने जोडण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये नेरूळ जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली. या जेटीवर सुमारे १११ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाची ना हरकत मिळण्यास जवळपास १६ महिन्यांचा विलंब लागला. त्यामुळे काम उशिराने सुरू झाले. अनेक अडथळे पार करून सुरु झालेले जी टी चे काम आता अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांनी आज जेटी ला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने यांच्यासह सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अडीच तासाचा प्रवास २५ मिनिटांवर !

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने जल प्रवासी वाहतुकीला विशेष प्राधान्य दिले आहे. मुंबई, ठाणे नवी मुंबई, अलिबाग, मांडवा या ठिकाणांना जोडणाऱ्या जलवाहतुकी मधील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ते मार्गाने होणारा अडीच तासांचा प्रवास थेट २५ मिनिटांवर येणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी यावेळी व्यक्त केली.

मेरीटाईम बोर्डाला हॅन्डओव्हर करणार !

प्रवासी जलवाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या नेरूळ जेटीचे काम उशिराने सुरू झाली आहे. मात्र हे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करून जेटी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हॅन्ड ओव्हर करण्यात येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »