पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने अनलॉक ५ ची घोषणा नुकतीच जाहीर केली त्यानुसार जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय यांना सर्व सरंक्षक बाबींचे काटेकोरपणे पालन करत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, दुकाने बंद करण्याची वेळ सायंकाळी ७ वाजताची असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येत नाही. ग्राहक साधारणतः संध्याकाळी सहा वाजल्यानंतर दुकानात येतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात आधीच दुकाने बंद असल्याकारणाने मोठया आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले त्यामुळे प्रामुख्याने दुकानदारांच्या व्यथा आहेत त्या म्हणजे दुकानाची भाडे, कामगारांचा पगार ,लाईट बिल यामुळे सर्वच व्यवसायिक त्रस्त आहेत.आता कुठे दुकाने उघडून दुकानदार आपला व्यवसाय सुरू करत आहेत त्यात शासनाच्या नियमानुसार संध्याकाळी ७ वा दुकाने बंद करावी लागतात. दुकानदारांचे म्हणणे आहे की खरे ग्राहक संध्याकाळी ७ वाजेनंतर यायला सुरवात होते कारण ग्राहक हे देखील आपल्या नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणावरून संध्याकाळी ६ वा सुटतात त्यामुळे त्यांना घरी येत येतच ७ वाजतात त्यामुळे ग्राहकांना देखील ते सामान अथवा वस्तू खरेदी करता येत नाहीत.
दुकान उघडे ठेवण्याची वेळ ही रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी दुकानदारांबरोबरच ग्राहकांची देखील असल्याचे नेत्रा पाटील म्हणाल्या. दुकानात दिवसभर २ ते ३च ग्राहक येतात त्यामुळे दुकानादारांचे भाडे निघेल एवढा देखील व्यवसाय अथवा विक्री होत नाही .ग्राहक यायची खरी वेळ ही संध्याकाळी ६ नंतर सुरू होते त्यामुळे आयुक्त महोदयांनी सदर वेळ वाढवून द्यावी अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली केली.
कोकण दर्पण.





