Press "Enter" to skip to content

आमची लढाई धनगर समाजाच्या न्याय-हक्कासाठी – मल्लिकार्जुन पुजारी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : धनगर समाजावर वर्षोनुवर्षे अन्याय झाला आहे, धनगर समाजाच्या न्याय-हक्काचा प्रश्न तसाच खितपत पडला आहे, त्यामुळे धनगर समाजाच्या न्याय-हक्काची लढाई कायम सुरु ठेवणार, समाजाला न्याय मिळवून देणार, ठोस भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. धनगर समाजाच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करावा, अशी मागणी देखील पुजारी यांनी केली.

धनगर समाजाचा मेंढपाळीचा परंपरागत व्यवसाय आहे. या गावातून त्या गावात त्यांची कायमची भ्रमंती सुरु असते. अशा वेळी अनेकदा समाजकंठकांकडून त्यांच्यावर हल्ले होतात. अनेकदा त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांना धमकावले जाते, त्यामुळे पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याचे धाडस ते करत नाहीत. हा अन्याय-अत्याचार समाजाने किती आणखी किती दिवस सहन करायचा,असा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजाच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करावा, स्वरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे.

धनगर समाजाच्या विविध प्रश्नांनावर पुजारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. आंदोलनानंतर धनगर समाजातील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

महाविकास आघाडीपूर्वी राज्यात भाजपची सत्ता होती. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले आणि धनगर समाजाची मते आपल्याकडे वळवून २०१४ मध्ये भाजप सत्तेत आले. मात्र, सत्तेत येऊन देखील भाजपने आपले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने करण्यात आली. आंदोलने करून आरक्षण तर मिळाले नाही, तर धनगर समाजातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.सामाजिक न्यायहक्कासाठी केलेल्या आंदोलनाचे सदर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचे पुजारी यांनी यावेळी नमूद केले.

कोकण दर्पण.