Press "Enter" to skip to content

नवी मुंबईला देशातील “तृतीय” क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा राष्ट्रीय बहुमान ! राष्ट्रीय सन्मान स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित – आयुक्त अभिजीत बांगर !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२० ” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये “तृतीय” क्रमांकाचा पुरस्कार गुरुवारी ऑनलाईन ‘स्वच्छ महोत्सव’ समारंभात केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला.

   मंत्रालयामधून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव  महेश पाठक व माजी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर, माजी आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर मान्यवर या स्वच्छ महोत्सव समारंभात ऑनलाईन सहभागी झाले होते.

   सध्याची कोरोना प्रभावित परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या नागरी कार्य व गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने या स्वच्छ महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. या स्वच्छ महोत्सवात 'स्वच्छ सर्वेक्षण २०२० ' मध्ये सहभागी संपूर्ण देशभरातील ४  हजाराहून अधिक शहरांमधून नवी मुंबई शहराला देशातील 'तृतीय' क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे. 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील ६  शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील 'फाईव्ह स्टार मानांकन' प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 'ओडीएफ डबल प्लस रेंटिंग' प्राप्त आहे.

   नवी मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखत राष्ट्रीय स्तरावरील मानांकन नेहमीच उंचावत नेले आहे. हीच परंपरा यावर्षीही कायम राखत गतवर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ' मध्ये देशातील सातव्या क्रमांकाचे मानांकन यावर्षी ४  क्रमांकांनी उंचावत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२० ' मध्ये देशातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे.

   हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणीवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याचे सांगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा राष्ट्रीय बहुमान समस्त स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केला आहे.

स्वच्छ सर्वंक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करीत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन मार्फत सुरू केलेल्या स्वच्छता ॲपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे १९६९ या टोल फ्री क्रमांकावरून तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावलीतून नवी मुंबईतील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले स्वच्छताविषयक काम व त्याला नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद देत दिलेला सक्रिय सहभाग यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील तृतीय क्रमांकाच्या शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे.

कोकण दर्पण.