Press "Enter" to skip to content

टाटा हॉस्पिटलच्या सुरक्षा अधिकाऱ्याविरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा ! नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे चालकाची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर टाटा कँसर हॉस्पिटलमधील उपमुख्य सुरक्षा अधिकारी राजन चव्हाण यांनी आपणास जातीवाचक शिवीगाळ करून सर्वसमक्ष वारंवार अपमानीत केल्याची तक्रार तेथील वाहनचालक म्हणून काम करणारे सत्यनारायण कांबळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सत्यनारायण कांबळे यांनी याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि खारघर पोलीस ठाण्यात देखील लेखी निवेदन दिले आहे. माझी नोकरी देखील राजन चव्हाण यांनी घालविली, असा आरोप करीत त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्यनारायण कांबळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि खारघर पोलीस पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.

खारघरमध्ये आई , वडील , पत्नी , मुलगा यांच्या समवेत राहत असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याचे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. प्राईमवन वर्कफोर्स कंपनीद्वारे टाटा हॉस्पिटलमध्ये ड्राइव्हर म्हणून नोकरीला लागलो.
वडिल गटई कामगार असल्याने चप्पल व बूट बनवत होते. हॉस्पिटलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा चप्पल व बूट बनवून दिले. तेव्हा राजन चव्हाण यांनी अनेकदा जातीवाचक शब्द वापरून धमकावले आणि तू तुझा चर्मकार व्यवसाय इथे करायचा नाही असे बजावले व सर्वसमक्ष जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे.

३ नोव्हेंबर २०१९ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशनानुसार ३ रुग्णांपैकी २ रुग्णांना त्यांच्या ठिकाणी पोहचवले. अन्य एकाला घ्यायला जात असताना एका दिव्यांग व्यक्तीने अतिदक्षता विभागात सोडण्याची विनंती केली .त्यामुळे तिसऱ्या रुग्णाला सोडायला विलंब झाला. त्यादरम्यान त्या रुग्णाने वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर मी लेखी माफी मागितली. मात्र , राजन चव्हाण यांनी सर्वसमक्ष जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्याचे कांबळे यांचे म्हणणे आहे. एव्हढेच नव्हे तर ज्या कंपनीच्या माध्यमातून नोकरी मिळाली त्या प्राईमवन वर्कफोर्स कंपनीकडे खोटी तक्रार करून स्वतःच्या पदाचा वापर करून नोकरीवरून काढल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

मात्र, राजन चव्हाण यांनी सत्यनारायण कांबळे यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. मी सर्व जाती- धर्माना एक मानतो, त्यामुळे असे अपमानीत करणे शक्य नसून सत्यनारायण कांबळे यांचे आरोप खोटे आणि चुकीचे आल्याचे राजन चव्हाण यांनी कोकण दर्पणशी बोलताना स्पष्ट केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »