लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात राजकीय वादळ उठविलेल्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये देखील आपले उमेदवार उभे केले आहेत. विरोधकांना टक्कर देण्यासाठी वंचितने कर्जत विधानसभा मतदार संघातून देखील आपला उमेदवार दिला आहे. कर्जत विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तरुण तडफदार उमेदवार अक्रम मोहम्मद इस्लाम खान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्जत विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार करून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले अक्रम खान यांची कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी घेतलेली हि रोखठोक मुलाखत !
प्रश्न १- वंचित बहुजन आघाडीचे आपण उमेदवार आहात , निवडणुकीकडे आपण कसे पहाता ?
अक्रम खान : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा चांगला प्रभाव दिसणार आहे. आमच्यासाठी हि फक्त निवडणूक नसून महाराष्ट्रामध्ये वंचितांना सत्तेत बसविण्यासाठीची हि लढाई आहे. विधानसभा निवडणुकीची हि लढाई आम्हाला जिंकायची आहे. कर्जत विधानसभा मतदार संघात अनेक वर्षे विकास झाला नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी आणि कर्जत विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.
प्रश्न २- कर्जत विधानसभा मतदार संघातील विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात ?
अक्रम खान : कर्जत विधान सभा मतदार संघ हा फार मोठा मतदार संघ आहे. नेरळ पासून कर्जत तालुका , खोपोली तालुका आणि खालापूर तालुक्यातील काही भाग या मतदार संघात येतो.एवढ्या मोठ्या मतदार संघाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. जे-जे सत्तेत आले त्यांनी फक्त जनतेला आश्वासने दिली आणि दिशाभूल केली. मात्र आता से होणार नाही. कर्जत विधानसभा मतदार संघातील जनता आता जागरूक झाली आहे. कर्जतच्या विकासासाठी सत्ता परिवर्तन नक्की होईल असा मला विश्वास वाटतो.
कर्जत विधानसभा मतदार संघात अत्याधुनिक सुविधांचे हॉस्पिटल सुरु करणार !
कर्जत मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वात पहिल्यांदा मला माझ्या जनतेचा आरोग्याचा प्रश्न सोडवायचा आहे. कर्जत आणि खोपोली मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी असलेले सुसज्ज असे हॉस्पिटल सुरु करणार आहे. या मतदार संघातील बराच परिसर हा ग्रामीण भागात मोडतो , तेथील सामान्य जनतेला आरोग्याची मूलभूत आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचा माझा पहिला मानस आहे.
कर्जत -पनवेल लोकल सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार !
कर्जत – पनवेल रेल्वेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. हा प्रश्न सरकारी यंत्रणेत रखडलेला आहे. तो सोडविण्यासाठी प्राधान्य देऊन कर्जत विधानसभा मतदार संघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देणायचे काम करणार आहे.
कोंढाणे धरणाचा प्रश्न सोडवून कर्जतमधील पाणी प्रश्न सोडविणार !
कोंढाणे धरणाचा प्रश्न देखील रखडला आहे. कोंढाणे धरण कर्जतकरांची तहान भागवू शकतो. मात्र या धरणावर अनेकांचे लक्ष आहे. मात्र या धरणावर कर्जतकरांचा अधिकार आहे. हे धारण कर्जतला मिळून देऊन येथील पाणी प्रश्न सोडविणार आहे.
माथेरान पर्यटनाचा विकास साधणार !
कर्जत मतदार संघाला चोहो बाजूनी निसर्गाने वेढले आहे. कर्जत मतदार संघातील माथेरान हे पर्यटनस्थळ आहे, येथे अनेक पर्यटक येतात. या पर्यटन स्थळाचा विकास करायचा आहे.
कर्जत- खोपोली विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र मुद्यांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ते प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. कर्जत आणि खोपोली तालुक्यातील नागरीप्रश्न आणि विकासाला खऱ्या अर्थाने गती देणार आहे. कर्जत , खोपोली आणि नेरळ मधील अनेक प्रश्न गंभीर आहेत. तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे , आदिवासी वाड्या पाडयाचे पाणी प्रश्न , रोजगार निर्मितीसाठी वेगळे प्रयत्न , सुरळीत वीज पुरवठा आदी प्रश्न सोडविण्याला प्राधन्य देणार आहे.
प्रश्न ३- कर्जत विधानसभा मतदार संघातील शैक्षणिक विकासाबाबत आपले काय धोरण आहे ?
अक्रम खान : नक्कीच , शिक्षण आणि त्याच बरोबर आधुनिक शिक्षण हि काळाची गरज आहे. मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोहीम राबविणार आहे. मतदार संघातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जात उंचावण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे.
प्रश्न ४ – मतदार संघातील कायदा सुव्यवस्था , महिला व जेष्ठ नागरिकांची सुरक्षा याबाबत आपण काय सांगाल ?
अक्रम खान : पोलीस बांधवांवरील अतिरिक्त ताण कमी करून मतदार संघातील कायदा सुवस्था आणखी उत्तम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विध्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण राबविणार आहे.
प्रश्न ५ – आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढतंय , तरुणांना रोजगार कसे द्याल ?
अक्रम खान : खालापूर तालुक्यात अनेक कारखाने बंद पडले आहेत. ते सुरु झाले तर अनेकांना नोकरी मिळेल. त्यासाठी प्रयत्न करणार आहेच. त्याच बरोबर तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणार आहे. त्याच बरोबर जनतेला उत्तम मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रश्न ६ – कर्जत मतदार संघात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे , त्यांच्यासाठी काय योजना आखली आहे काय ?
अक्रम खान : कर्जत मतदार संघातील माझ्या आदिवासी बांधवांवर अनेक वर्ष अन्याय झाला आहे. नागरी मूलभूत सुविधांपासून ते वंचित राहिलेले आहेत. त्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्याचा माझा निर्धार आहे.
प्रश्न ७ – रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघ आहे , येतेच ऐतिहासिक आठवणींचा ठेवा कसा जपाल ?
अक्रम खान : कर्जत मतदार संघाला एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा माझा मनोदय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणार आहे. यातून समाजाला आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल.
कोकण दर्पण.





