Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – अशोक गावडे यांचा निर्धार ; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून गेल्या १५ वर्षात त्या सुटलेल्या नाहीत. नागरिकांना भेडसावणाऱ्या अशा सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार अशोक गावडे यांनी केला आहे. गावडे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळी ते बोलत होते.
नवी मुंबई शहर म्हणजे भारत किंवा महाराष्ट्राचे नॅनो मॉडेल आहे. देशाच्या विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पच्छिम महाराष्ट्र आणि कोकणचे नागरिक शहरात या शहरात एकजीव झालेले आहेत. नवी मुंबई शहरात गाव-गावठाण, झोपडपट्टी आणि शहरी असे भाग असल्याने शहरातील प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या असून त्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना न्याय मिळू शकलेला नाही परंतु या सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असून नागारिकांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे गावडे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने विविध सुविधा पुरविण्यावर भर देणार असून कंत्राटी कामगार, असंघटित नका कामगार, घरकाम करणाऱ्या महिला आदिसांसाठी कौटुंबिक आरोग्य विमा योजना राबविणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. नवी मुंबई शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून शहरात भविष्यात ट्रांजिस्ट कॅम्पची गरज असल्याने त्यांची निर्मिती करणार असल्याचे ते म्हणाले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्केट, शाळा, कॉलेज, चौक आदी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शहरातील प्रकल्पग्रस्तांना उद्योगनिहाय प्रशिक्षण देऊन विमानतळ, आयटी पार्क आदी ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणे, सुशिक्षित, असुशिक्षित महिलांसाठी कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण किंवा नोकरी निमित्त शहरात एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी महिला वसतिगृह निर्माण करणे, नागरिकांना सुविधांयुक्त पदपथ आणि सायकल ट्रॅकची निर्मिती करणे, मेट्रोचे रखडलेले काम सुरु करून बेलापूर तुर्भे मार्गे शिळफाट्यापर्यंत विस्तारित करणे, खारकोपर पर्यंतची रेल्वे सेवा उरणपर्यंत सुरु करणे, नवी मुंबईतील एमएच 43 वाहन धारकांना वाशी आणि ऐरोली येथील टोलमाफी करणे, बसडेपोच्या जागेत बहुमजली वाहन पार्किंगची व्यवस्था निर्माण करून देणे, सानपाडा रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्ग चारपदरी करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच एफएसआय मंजूर करून पुनर्बांधणी करणे, झोपडपट्टी भागासाठी स्लम रिडेव्हलपमेंट योजनेखाली पक्की घरे बांधणे, गाव गावठाणांचा वाढीव क्षेत्रफळाने पुनर्विकास करणे, गावठाणातील प्रकल्पग्रस्तांनी आवश्यकतेमुळे बांधलेल्या वाढीव बांधकामांना मदत करणे, खाजगी शाळांच्या डोनेशन आणि फी वर नियंत्रण आणणे, शालेय बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी बहुउद्देशीय निवारा शेड बांधणे, शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी सर्वोतपरी मदत करणे, शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने विविध कामे करून कचराकुंडी मुक्त शहर संकल्पना राबविणे यासारखी शहरातील प्रलंबित कामे मार्गी लावणार असून शहरातील सर्व घटकांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देणार असल्याचे गावडे यांनी आश्वासित केले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, भालचंद्र नलावडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण दर्पण.