नवी मुंबईतील राजकीय उलथापालथी नंतर नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले. राष्ट्रवादीला नवसंजीवनी कशी द्यायची , कोणाच्या खांद्यावर नवी मुंबईची जबाबदारी द्यायची ,असा प्रश्न राष्ट्रवादीच्या श्रेष्ठीना पडला होता. अशा वेळेस एक निष्ठावंत मावळा पुढे आला आणि नवी मुंबई राष्ट्रवादीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अशोक अंकुश गावडे असे त्या मावळ्याचे नाव आहे. पक्षाने त्यांच्यावर नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊन अशोक गावडे नवी मुंबईत पक्ष बांधणीच्या कामाला लागले. जवळ असतील त्या मावळ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी मुंबईत राष्ट्रवादीला उभारी देण्याची वाटचाल सुरु झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेरुळ येथे झालेल्या सभेने कार्यकर्त्यामध्ये जान फुंकली. हाच आत्मविश्वास घेऊन मोठ्या निष्ठेने सेनापती बनलेले अशोक गावडे नवी मुंबईत राष्ट्रवादीची आन – बाण आणि शान राखण्यासाठी स्वतः निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. बेलापूर विधानसभा मतदार संघातून अशोक गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिला आहे आणि आपला विजय निश्चित आहे, असा त्यांचा विश्वास आहे. बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी अशोक गावडे यांची घेतलेली हि रोकठोक मुलाखत !
प्रश्न- १ : विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहताय ? बेलापूर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कसा घेतला ?
अशोक गावडे : बेलापूर विधानसभा मतदार संघ हा मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे. नवी मुंबईत झालेली राजकीय उलथापालथ हि नवी मुंबईतील सच्चा कार्यकर्त्याच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकत नाही.इथला कार्यकर्ता हा आदरणीय शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारा ,त्यांच्यावर विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व नवी मुंबईत कायम आहे आणि असेल. रणांगणात नेतृत्व करण्याची जबाबदारी सेनापतीची असते आणि आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने नवी मुंबईचा जिल्हा अध्यक्ष म्हणून बेलापूर विधानसभा मतदार संघातून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. त्यामुळे बेलापूर विधानसभा निवडणूक लढण्याचा हा नुसता निर्णय घेतला नसून हा विजयाचा निर्धार आहे.
प्रश्न – २ : विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ?
अशोक गावडे : नवी मुंबई शहर आणि बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. नवी मुंबई महापालिकेत आणि नवी मुंबईत राष्ट्रवादीची सत्ता होती. आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शहनाखाली नवी मुंबईचा विकास झाला. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली. मात्र येथील अनेक प्रश्न अद्यापि प्रलंबित आहेत हि वस्तुस्थिती आपणास नाकारता येणार नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शहराला देशातील आदर्श नवी मुंबई महापालिका म्हणून गौरविण्यात आले. नक्कीच आपणासाठी हे भूषणावह आहे ,मात्र दुसरीकडे आपल्या शहरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे आपण गाम्भीर्यने पाहिले पाहिजे. इथल्या समाज बांधवांचे जीवनमान उंचवायचे असेल , खऱ्या अर्थाने एक नियोजित आणि स्वच्छ शहर म्हणून पहायचं असेल तर नवी मुंबईतील झोडपट्टी पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न सुटला पाहिजे. आता पर्यंत या प्रश्नात काय राजकारण झाले त्यात मी जाणार नाही ,पण जनतेने मला संधी दिली तर हा प्रश्न मी प्राधान्याने सोडविणार आहे.
बेलापूर विधानसभाच नव्हे तर नवी मुंबईतील सामान्य जनता अत्याधुनिक आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. नवी मुबई महापालिकेची भव्य दिव्य इमारती असलेली हॉस्पिटल आहेत ,मात्र तिथे उपचार देखील त्याच दर्जाचे मिळावे , यासाठी मी प्राधान्य देणार आहे.
नवी मुंबईतली कायदा सुवव्यस्था चांगली असली तरी रस्त्यावरून पायी जाणारी महिला सुरक्षित आहे का ? विध्यार्थी सुरक्षित आहे का? हा प्रश्न कायम आहे. दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरांचे थैमान शहरात वाढले आहे. खऱ्या अर्थाने इथली कायदा सुव्यवस्था आबादित आणि सतर्क राखण्यासाठी बेलापूर विधानसभा आणि संपूर्ण नवी मुंबई शहरात सीसी टीव्ही कॅमेराचे जाळे पसरविले पाहिजे. या महत्वपूर्ण कामाला मी प्राधान्य देणार आहे.
आज नवी मुंबईत दर्जेदार शिक्षणाचा प्रश्न आहे . भरभक्कम शालेय शुल्क आकारणी करून मनमानी करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्थांचे फावले आहे ,त्यावर सरकारचे हवे तसे नियंत्रण नाही, शिक्षणाची गळचेपी सुरु आहे.मध्यम वर्गातील विध्यार्थी महागड्या शाळेत शिकू शकत नाही. वारंवार सरकारचे बदलणारे धरण हे शिक्षण सम्राटांना प्रोत्साहित करणारे आहे.या मूलभूत प्रशांसाठी मी लढणार आहे.
स्किल एज्युकेशन हि काळाची गरज आहे. उद्या नवी मुंबई एअर फोर्ट सुरु होईल ,पण तिथे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी इथल्या स्थानिक तरुणांना , नवी मुंबईकरांना तसे स्किल एज्युकेशन कुठे दिले जाते ? विमानात आणि विमानतळावर रोजगार मिळणार पण ते स्किल सरकारने तयार करून घेतले पाहिजे ,त्याची तयारी आताच झाली पाहिजे म्हणून मी प्राधान्य देणार आहे.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील पायाभूत नागरी सुविधा आणि विकास यासाठी मी कटिबद्ध आहेच ,मात्र बेलापूर मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
बेलापूर किल्याचे संवर्धन आणि बेलापूर किल्ला एक पर्यटनस्थळ म्हणून कसे विकसित होईल यासाठी पाठपुरावा करणार आहे.
नवी मुंबई हि इथल्या भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर वसली आहे ,मात्र साडेबारा टक्के भूखंड वाटप अद्यापि पूर्ण झालेले नाही.प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी वाढविलेल्या घरांचा प्रश्न तसाच आहे. माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवाना आणि माथाडी कामगारांच्या न्यायहक्कासाठी मला लढायचं आहे.
प्रश्न – ३ : या अगोदर झालेल्या बेलापूरच्या दोन्ही आमदारांनी बेलापूर विधानसभेला खऱ्या अर्थाने न्याय दिला असे तुम्हाला वाटते काय ?
अशोक गावडे : अगोदरच्या आमदारांनी काय केले याबाबत मला बोलायचे नाही ,मात्र मी काय विकास करणार आहे ,हे नक्की जनतेला सांगणार आहे.
प्रश्न -४ : बेलापूरचा गड राष्ट्रवादी राखेला का ?
अशोक गावडे : हि लढाई आम्ही सत्याने लढत आहोत.जनतेला बदल हवा आहे ,त्यामुळे विजयश्री मिळविण्यासाठीच आम्ही रणांगणात उतरलो आहोत.
कोकण दर्पण
.





