कर्जत, कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत मतदार संघात खरे तर शिवसेनेचेच प्राबल्य आहे . मात्र येथील शिवसेनेला बंडखोरीचा शाप असल्याने दरवेळेस विधानसभा निवडणुकीत सेनेतील कोणीतरी तगडा नेता बंडखोरीचे निशाण फडकावतो आणि मतांची विभागणी होऊन राष्ट्रवादीचा विधानसभेचा उमेदवार अगदी थोड्या फार मताधिक्याने हा होईना निवडून येतो .त्यामुळे यावेळेस शिवसेना भाजप युती होऊन सेनेला उमेदवारी मिळाल्यास आणि पक्ष नेतृत्वाला बंडखोरी रोखण्यात यश आल्यास सेनेच्या उमेदवाराचेच पारडे अधिक जड राहील अशी शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे . एकंदरीत मागील २०१४ च्या विधानसभेत महेंद्र थोरवे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे.अवघ्या काही थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला.परंतू महेंद्र थोरवे यांनी त्या दिवसांपासून आपल्या पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत ,नगरपरिषदेवर विशेष लक्ष दिले आणि शिवसेनेचा झेंडा फडकावला.त्यामुळे या कर्जत मतदारसंघात मातोश्रीवरून महेंद्र थोरवे यांच्या नावाची पसंती देण्याचे संकेत दिले जात आहे
२०१४ मध्ये राष्टवादीचे आमदार सुरेश लाड निवडून आल्यावर सेनेचेही वाढलेले वर्चस्व पाहून मतदार संघात राष्ट्रवादीचे संघटन अधिक वाढवून मजबूत करण्याची गरज असतांना घडले उलटेच . त्यानंतर खोपोली ,माथेरान , कर्जत नगर पालिका निवडणुकीत सेनेने बाजी मारत माथेरान आणि कर्जत नागरपरिषदेवरील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत पालिकांवर सेनेचा भगवा फडकावला . तर खोपोली नगरपालिकेत सुद्धा जेथे सेनेचे जेमतेम दोन नगरसेवक होते त्यांची संख्या वाढून दहावर पोहोचली . आणि राष्टवादीचे मताधिक्य घटले . कर्जत पंचायत समितीवरही सेनेने बहुमत मिळवत सत्ता काबीज करत सेनेचा सभापती बसविला . तालुक्यातील सर्वात मोठी आणि सधन समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत निबावडणुकीत सेनेचाच सरपंच झाला .त्यामुळे शिवसेनेचे वाढलेले वर्चस्व रोखण्यात राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यशस्वी होतील का, कि शिवसेनेचे महेंद्र थोरवे बाजी मारतील हे निकालदरम्यान स्पष्ट होईलच.
कोकण दर्पण.





