नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडीच्या माध्यमातून भाजप सरकारने सूडबुद्धीने पाठवलेली नोटीस मागे घ्यावी अन्यथा, महाराष्ट्र राज्यातील जनता रस्त्यावर उतरेल, याच्या परिणामांना सरकार जबाबदार असे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी आज सरकारला दिला.
शरद पवार यांच्यावरील ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.सदर कारवाईच्या निषेधार्थ आज २६ सप्टेंबर रोजी शिवाजी चौक वाशी येथे जाहीर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाअध्यक्ष अशोक गावडे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला.
शरद पवार हे शिखर बँकेच्या संचालक बोर्डावर नसताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीत भाजप सरकारने ईडीच्या माध्यमातून सुडाचे राजकारण केले असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी यावेळी केली आहे.
भाजप सरकारची हि भूमिका राज्याला अधोगतीकडे नेणारी आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक जिंक्यचा भाजपचा हा डाव आहे. भाजपने तयारी असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे , असे आव्हान भाजपला केले. भाजप सरकारची नीती आता जनता ओळखून आहे, या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारला नक्कीच खड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही , असा विश्वास अशोक गावडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान , सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है ,,या सरकारचे करायचे काय ,खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देऊन राष्ट्रवादीने नवी मुंबई दणाणून सोडली. यावेळी प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, नवी मुंबई प्रवक्ता अफसर इमाम , नगरसेविका सपना गावडे तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.





