Press "Enter" to skip to content

भाजप-शिवसेना युतीच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा ! बेलापूर, ऐरोली, पनवेल, उरणमध्ये काय होणार ?

नवी मुंबई / पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचे वातावरण अगदी तापले असताना भाजप-शिवसेना युतीबाबतचा अंतिम निर्णय अद्यापि प्रलंबित आहे. मात्र ,बेलापूर, ऐरोली, पनवेल, उरणम मतदार संघातील दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवार हे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे बेलापूर, ऐरोली, पनवेल, उरणमध्ये काय होणार ? युतीची घोषणा झालीच तर युतीधर्म पळाला जाईल का ? असे प्रश्न सध्या युतीभोवती फिरत आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. बेलापूर मधून शिवसेनेचे नेते विजय नाहटा हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात होते तर भाजपकडून आमदार मंदाताई म्हात्रे लढल्या. ऐरोलीमध्ये शिवसेनेकडून विजय चौगले तर भाजपकडून वैभव नाईक लढले होते.
२०१४ मध्ये मंदाताई म्हात्रे या राष्ट्रवादीला सोडून भाजपात आल्या होत्या. भाजपने त्यांना बेलापूर मतदार संघातून उमेदवारी देखील दिली. त्यावेळी मोदी करिष्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. माजी मंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर गड ताब्यात घेतला. बेलापूर मतदार संघातून मंदाताई जिंकून आल्या. मात्र, आता माजी मंत्री गणेश नाईक यांनी देखील कमळाची माळ गळ्यात घातल्याने मंदाताईबरोबर भाजपमध्ये बेलापूर मतदार संघात दोन दावेदार झाले आहेत. मात्र , मंदाताई या विद्यमान आमदार असल्याने नैसर्गिकरित्या पहिल्या दावेदार त्याच असल्याचे बोलले जात आहे. मात्र , शिवसेना- भाजप युती झाल्यास बेलापूर मतदार संघ शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे.
ऐरोली मतदार संघात विध्यमान आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आले आहेत. त्यामुळे संदीप नाईक यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपला ऐरोली मतदार संघ त्यांना देणे भाग आहे. जर ऐरोली भाजपच्या वाट्याला गेला तर बेलापूर मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी बेलापूर मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. विजय नाहटा यांनी बेलापूर मतदार संघातून निवडणुकीची तयारी केली असल्याने ते सहजासहजी निवडणुकीतून माघार घेतील अशी परिस्थिती दिसत नाही.

…तर दादा – ताईंचं काय ?

शिवसेना – भाजप युती जर झालीच नाही तर आमदार मंदाताई म्हात्रे यांचा बेलापूर मतदार संघातून पहिला दावा असेल हे स्पष्ट आहे. पुत्र संदीप नाईक यांची ऐरोलीतून उमेदवारी निश्चित मानल्याने माजी मंत्री गणेश नाईक तूर्त संयम राखतील असे दिसते. गणेश नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय कमिटमेंट केलीय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र युती झाली तर बेलापूर मतदार संघ शिवसेनेला आणि ऐरोली मतदार संघ भाजपला जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. युतीचा सरळ फटका आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उमेदवारीला अडचणीत टाकणारा आहे. मात्र, मंदाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे युतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री फडणवीस ऐरोली बरोबर बेलापूर मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पाडून घेतील का ? शिवसेना देखील बेलापूर मतदार संघ सोडेल का ? हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.राजकीय आत्मविश्वास आभाळाला टेकलेल्या आमदार मंदाताई म्हात्रे नेमका काय स्टॅन्ड घेतात , याबाबत नवी मुंबईकरांना उत्सुकता आहे .

महेश बालदी यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत स्वस्थता !

उरण मतदार संघ हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. युतीबाबत अंतिम निर्णय जरी झाला नसला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्यापि युती होईल असे म्हटलं आहे. उरण मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर आहेत. या मतदार संघावर शिवसेनेचा दावा असताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. तशी जोरदार रणनीती देखील आखली आहे. त्यामुळे उरण शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. युती न झाल्यास मनोहर भोईर आणि महेश बालदी आमने सामने लढतील.

भाजपकडून पनवेल जिंकणं विरोधकांना आव्हान !

विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे मात्र अद्यापि विरोधकांकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. काँग्रेस -राष्ट्रवादी -शेकाप आघाडीत पनवेल मतदार संघ शेकापला दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शेकापने पनवेल महापालिकेतील विरोधीपक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांना पनवेलमधील उमेदवार म्हणून परिचित केले होते. मात्र अद्यापि प्रीतम म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा न झाल्याने कार्यकर्ते देखील निरुत्साही झाले आहेत. काँगेसने देखील काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र , पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडुनिकचे रणशिंग फुंकल्यामुळे पनवेल भाजपकडून जिंकणे विरोधकांना मोठे आव्हान आहे.

कोकण दर्पण.