Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचा आरंभ होतोय, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा – शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली स्फूर्ती !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : आज देश भयंकर परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे गंभीर प्रश्न भेडसावत आहेत. औद्योगिक क्षेत्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र या परिस्थितून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेरुळ -नवी मुंबई येथे केली. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या नव्या पर्वाचा आरंभ होतोय, आपल्याला लढाई जिंकायची आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा , असे आवाहन करत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना स्फूर्ती दिली.  जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा आपल्याकडे सत्ता भोगली आणि आता सत्तेसाठी पक्ष सोडून विरोधकांकडे गेले. अशा जाणाऱ्यांचे दुःख करायची गरज नाही. जनता स्वाभिमानी आहे, अशा स्वार्थी राजकारण्यांसाठी जनता आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, जनता त्यांची जागा दाखवून देईल , असा टोला देखील शरद पवार यांनी यावेळी लगावला. समाजकारणात आणि राजकारणात कोणती विचारधारा घेऊन आपण काम करत हे महत्वाचे असते. सत्ता नसली तरी आपण काम करू शकतो. विरोधी पक्षात राहून काम करण्याची मानसिकता असायला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.
कोल्हापूर, सांगली सातारा मध्ये महापूर आला तेव्हा संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी महाजानदेश यात्रा बाजूला ठेवून तिथे राहिले पाहिजे होते.मात्र राज्यकर्त्यांनी चार दिवस भेट दिली आणि नंतर पाठ फिरवली. बेलापूर औधोगिज पट्टा बंद पडतोय. नवीन रोजगार दिला नाही मात्र हातात असलेला रोजगार देखील सरकार हिसकावून घेत मूठभर उद्योगपतींचे हित जोपासत आहे , सत्ताधाऱ्यांची हि मानसिकता असल्याची टीका शरद पवार यांनी यावेळी केली .

आज महाराष्ट्रात पक्षांतराला ऊत आला आहे. भ्र्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीच्या भीतीने पक्ष बदलून लोक जात आहेत. मात्र गणेश नाईक का गेले ? अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी खेद व्यक्त केला. जे गेले त्यांची चिंता करू नका , आपणास युद्ध जिंकायचे आहे , अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.

एकदा गणेशोत्सव संपला कि गणेश विसर्जनानंतर त्याविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही, एकदा सरंजामशाही संपल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला लढण्याची आणि भिडण्याची संधी उपलब्ध झाली त्याचा हा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे, असे जोरदार टीकास्त्र खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर सोडले. जुलमी सत्तेविरोधात उठवणारे ते बंड असते आणि सत्तेच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणे हि फितुरी आणि लाचारी असते. जनतेच्या विकासाच्या नावावर पक्षांतर करणारे हे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी पक्षांतर करीत असल्याचा टोला देखील डॉ कोल्हे यांनी यावेळी लगावला .

गेल्या पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्याचे गृहमंत्री पद असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराची ओळख ओळख क्राईम कॅपिटल म्हणून झालेली आहे .तिथे चार दिवसात एक खून , दोन दिवसाला एक बलात्कार होतो , दरदिवशी अपहरणाचा एक गुन्हा घडतो, ज्या सरकारच्या काळात महाराष्टरचे कर्ज दुपटीने वाढले ,५४ वर्षात महाराष्ट्रावर असलेले २ लाख ८५ हजार कोटी रुपयांचं कर्ज भाजपच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत दुप्पट म्हणजे पाच लाख कोटींवर गेले. पारदर्शकतेचे उत्तर न देणाऱ्या सरकारसोबत जाणार्यांना कोणता विकास साधायचा आहे, असा प्रश्न डॉ कोल्हे यांनी उपस्थित केला. ४५ वर्षात नव्हती इतकी बेरोजगारी महाराष्ट्रात आहे . महाराष्ट्रातील तरुणाच्या भविष्याचे वाटोळे लावण्याचे पाप भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने केले आहे. ७२ हजार रोजगारांच्या मेघाभरतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी महापोर्टलचे काम मध्य प्रदेश मधील यूएसपी ग्लोबल या घोटाळेबाज कंपनीला दिले. वनरक्षकांची जी यादी घोषित झाली त्यामध्ये शारीरिक चाचणीला उपस्थित नसलेल्या उमेदवारांचा समावेश आहे, असे सांगत सरकारची पारदर्शकता कुठे गेली असा सवाल केला .

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड , आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील यावेळी भाजप सरकार आणि सत्ताबदलूंचा खरपूस समाचार घेतला आणि कार्यकर्त्यांना नव्या दमाने लढण्यासाठी आत्मविश्वास दिला.

यावेळी नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या यशस्वी वाटचालीबाबत विश्वास व्यक्त करताना गणेश नाईक यांच्या भूमिकेबाबत जोरदार टीका केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली दोन्ही मतदार संघातून आपले उमेदवार जिंकून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी गणेश नाईक यांच्या धोरणांची चांगलीच चिरफाड केली. ज्या राष्ट्रवादी पक्षाने नाईक कुटुंबियांना भरभरून दिले त्यांनी २०१४ पासूनच वेगवेगळ्या मार्गाने पक्ष कमजोर करण्याचे आणि कार्यकर्त्याच्या आत्मविश्वाचे खच्चीकरण करण्याचे षडयंत्र रचले होते. पक्षांतर करून २०१९ मध्ये त्याची मंलबजावणी केली. मात्र , जो पर्यंत माझ्यासारखा मावळा जिवंत आहे , तो पर्यंत नवी मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसला संपविणायचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही , असा वज्र निर्धार अशोक गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपात चला म्हणून रात्री दोन वाजता माझ्या घरी जगविण्यासाठी आलेल्या आमदार संदीप नाईक यांना राष्ट्रवादीचा स्वाभिमान दाखवून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. येत्या विधानसभा निवडणुकीत आणि पुढे येणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी मुंबईतील ताकत विरोधकांना दाखवून देऊ, विश्वास अशोक गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोकण दर्पण.