Press "Enter" to skip to content

तळोजा वसाहतीमधील पाणी प्रश्न पेटणार !

तळोजा , कोकण दर्पण वृत्तसेवा : तळोजा सिडको वसाहतीमधील पाण्याचा प्रश्न पेटणार असल्याची सध्याची परिस्थिती आहे. तळोजामध्ये कॉलनीमध्ये कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे सिडको प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील अधिकारीवर्ग सदर प्रश्न सोडविण्यात गांभीर्य दाखवीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तळोजा वसाहतीतील नागरिक संतप्त झाले आहेत. पाण्याचा प्रश्न वेळीच न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे तळोजामधील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ दिवसापासून तळोजा वसाहतीमध्ये सिडकोकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जवळजवळ थांबला आहे. एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी येत असल्याचे कारण सांगून सिडको अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. गेले आठवडाभर जनतेकडून वारंवार संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना देखील सिडको प्रशासन मात्र शांत बसले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस प्रसाद पाटील यांनी देखील सिडको प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र , परिस्थिती जैसे थे आहे. सदर प्रश्नावर सिडको प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आणि येथील पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी रविवारी तळोजा शहरातील चाळीस सोसायट्यांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर, उपाध्यक्ष आनंद भंडारी, जिल्हा सचिव बबनराव पवार, जिल्हा सरचिटणीस आजिनाथ सावंत, ऍड राजेश मोतेवाड यांनी जनतेला मार्गदर्शन केले. लोकांकडून पाणी व इतर समस्या यासंदर्भात आंदोलनाची मागणी यावेळी करण्यात आली. अनुराग श्रीवास्तव यांनी पाण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची आरटीआय अंतर्गत माहितीचा अर्ज करावा व माहिती मागवावी अशी मागणी केली.त्या अनुषंगाने वरील सर्व पदाधिकारी व प्रसाद पाटील यांनी सर्व मागण्यांची जबाबदारी घेऊन पूर्ण करण्याची ग्वाही दिली. या बैठकीस सामाजिक एकता संस्थेचे सदस्य चंद्रशेखर मोरे ,बालाजी इंगळे निरंजन विश्वास ,चंपा विश्वास शोएब सुर्वे ,विजय पाटील ,विजय लोहारचे सदस्य उपस्थित होते.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »