माणगाव , कोकण दर्पण वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून अतिवृष्टी, वादळ व महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले असून रायगड जिल्ह्यामध्ये लवकारात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगड जिल्हा राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष प्रमोदभाई घोसाळकर ,संतोष निगडे, अशिष भट,प्रविण ननावरे, रूषिकांत भगत आदि मान्यवर व कार्यकर्त्ये उपस्थित होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान त्यामुळे शासनातर्फे त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शक्य तितक्या लवकर नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीबरोबरच ग्रामीण व शहरी भागांत घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे व्हावे ,मुंबई गोवा हायवे तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक देखील अद्याप सुरळीत चालू नसल्याने सुरळीत चालू करावे, शासकीय माहितीनुसार १५ जणांची जिवीतहानी झाली आहे असे असल्यास मृतांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळावी, आंबा व इतर वृक्ष बागायतदारांना भरीव भरपाई मिळावी अशी मागणी रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या या भयावह परिस्थितीत आपत्तीव्यवस्थापन पूर्ण पणे कोलमोडून गेल्याचे दिसून येत आहे तर जिल्ह्याचे पालकत्व असलेले पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आपत्तीग्रस्त, नुकसानग्रस्त अशी कुटुंबे, शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत असून सद्य परिस्थिती सुधारणेसाठी केलेल्या मागण्यांची कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.
कोकण दर्पण .





