पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कामोठे येथील अपघातात निष्पापांचा नाहक बळी गेला आहे. मात्र सदर प्रकरणाची कठोरपणे चौकशी करण्यात कामोठे पोलीस गांभीर्य का दाखवत नाही ? असा सवाल कामोठेवासी करीत आहेत. दरम्यान, कामोठे येथील अपघाताची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अपघातात नाहक बळी गेलेल्या निष्पापांना आणि जखमींना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके ,कामोठे युवक अध्यक्ष प्रमोद बागल ,राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा सचिव आदिनाथ सावंत , पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस बबनराव पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. आता मुख्यमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
कामोठे सेक्टर ६ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर एका भरधाव वेगातील स्कोडा गाडीने सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवार २१ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये ७ वर्षांच्या सार्थक चोपडे या मुलाचा आणि वैभव गुरव या ३२ वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेला. पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि प्रशांत माने हे चार जण जखमी झाले. त्यांना तात्काळ कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सदर घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील कैद झाली आहे.
सदर प्रकरणात चौकशी करताना पोलिसांनी गांभीर्य दाखवावे , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी केला आहे. सदर प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी लक्ष घालावे , सखोल चौकशी करावी, आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी , अशी मागणी बळीराम नेटके यांनी केली आहे.
कोकण दर्पण .





